राज्यातील अनेक नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपच्या संपर्कात असून चांगल्या नेत्यांचा पक्ष जरूर विचार करेल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते येथे विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या पत्रकार परिषदेला खासदार संजय धोत्रे, आमदार चैनसुख संचेती, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे यांची उपस्थिती होती. भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदा आलेल्या आमदार देवेंद्र फडणवीस यांचे येथे जोरदार स्वागत झाले.
राष्ट्रवादीमधील अकोल्यातील माजी आमदार भाजपच्या संपर्कात आहेत का, या मूळ प्रश्नाला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे बडे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला. चांगल्या नेत्यांना पक्षात स्थान देण्याचा विचार होऊ शकतो, असे मत त्यांनी मांडले. चांगल्या नेत्यांची व्याख्या करताना त्यांनी जनतेशी नाळ जुळलेले संवेदनशील नेते, असा उल्लेख केला. पक्षातील बंडखोरांबद्दल पक्षातील अनुशीलन समिती जो निर्णय घेईल तो अंतिम असेल, असे म्हणत त्यांनी बंडखोरांना योग्य तो संदेश दिला. पक्षात नेतृत्वाचा कुठलाही वाद नसल्याचे मत त्यांनी मांडले.
दिल्लीतून राज्यात आलेले मुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या दबावापुढे झुकल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील सरकार असभ्य असून राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्र्यांचे वक्तव्य सत्तेचा माज दाखवीत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. सरकारविरोधात मुद्दे असताना विरोधक ते मांडण्यात कमजोर पडले नाहीत. हे मुद्दे जनतेपर्यंत नेऊन सरकारविरोधातील लढाई आम्ही जिंकू, असा आशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला. आघाडी सरकारविरोधातील सर्व पक्षांनी युतीसोबत एका व्यासपीठावर यावे. यात मनसे, शेकाप व इतर छोटय़ा पक्षांनी आघाडी सरकारविरोधात एकत्र येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मनसेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.
राज्यातील दुष्काळी संकट अस्मानी असले तरी ते सुलतानी अधिक असल्याची टीका त्यांनी केली. राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील सांगोळा येथे दुष्काळाच्या निधीत घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. बारामती या पवारांच्या मतदारसंघातील हा घोटाळा असल्याची पुष्टी त्यांनी जोडली. आदिवासी, दलित व मागासवर्गीयांच्या योजनांमध्ये अनेक घोटाळे आहेत. केंद्र व राज्यातील आघाडी सरकारविरोधात जनमत तयार झाले असून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत याचा प्रत्यय येईल, असे सूतोवाच त्यांनी केले.