लोकसभा निवडणुकीतील रणनीती ठरविण्यासाठी रविवारी बोलाविण्यात आलेली  काँग्रेस व राष्ट्रवादीची संयुक्त बठक नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे लांबणीवर टाकण्यात आली. तथापि शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मुन्ना कुरणे यांनी बोलाविलेल्या बठकीस महापौर, उपमहापौरांसह काँग्रेसच्या नगरसेवकांनी उमेदवाराच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
लोकसभेची उमेदवारी केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतीक पाटील यांना जाहीर झाल्यानंतर काँग्रेस कमिटीमध्ये रविवारी आघाडीची रणनीती निश्चित करण्यासाठी बठक बोलाविण्यात आली होती. या बठकीस पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्यासह ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास  महामंडळाचे अध्यक्ष मदन पाटील उपस्थित राहणार असल्याचे काँग्रेस कार्यालयातून सांगण्यात आले होते. मात्र रात्री उशिरा जयंत पाटील या बठकीस हजर राहू शकत नसल्याचे स्पष्ट झाले. तर गृहमंत्री आर. आर. पाटील तातडीच्या बठकीसाठी मुंबईला रवाना झाले. पालकमंत्री डॉ. कदम जिल्हा दौऱ्यावर असले तरी स्न्ोह्यांच्या लग्न कार्यात व्यस्त असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. या नेत्यांची संयुक्त बठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे प्रचार समितीकडून सांगण्यात आले.
दरम्यान शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे यांनी बोलाविलेल्या बठकीस महापौर कांचन कांबळे, उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.