राज्यातील पाच जिल्हा सहकारी बँकांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कोट्यवधी रूपयांचे कर्ज थकवल्याप्रकरणी नोटीस जारी केले आहे. पाच जिल्ह्यातील अकरा सहकारी साखर कारखान्यांच्या संचालकांनी सहकारी जिल्हा बँकांचे १२२३.९३ कोटी रुपयांचे कर्ज थकवले आहे. हे सर्व साखर कारखाने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मातब्बर नेत्यांचे आहेत. कोटयवधींचे कर्ज थकल्यामुळे सहकारी बँकाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. कोट्यवधी रुपयांचे कर्ज थकवल्याबद्दल राज्य सरकारने ११ मोठ्या साखर कारखान्यांना नोटीसा बजावल्या आहेत.

नाशिक, सोलापूर, वर्धा, बुलढाणा आणि उस्मानाबाद या पाच जिल्हा बँकाचे तेथील साखर कारखाण्याने कर्ज थकवले आहेत. ११ सहकारी साखर कारखान्यांना सरकारी हमीवर जिल्हा बँकांनी कर्ज वितरण केले होते. पण या कारखान्यांनी कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यामुळे या बँकांची रोख तरलता संकटात आली आहे. त्यामुळे कर्जवसुलीसाठी वित्त विभागाने सहकार विभागाच्या मार्फत या कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

पद्मसिंह पाटील (तेरणा सहकारी साखर कारखाना), दिलीप सोपल (आर्यन शुगर कारखाना), विजयसिंह मोहिते पाटील (शंकर सहकारी साखर कारखाना), सुरेश देशमुख (सहकार महर्षी स्व. बापूरावजी देशमुख साखर कारखाना), राहुल बोन्द्रे (मुंगसाजी महाराज शुगर मिल आणि सहकारी सूतगिरणी) यांच्याकडे सहकारी बँकाची थकबाकी आहे.

यामध्ये सोलापूर जिल्हा सहकारी बँकेकडून आर्यन शुगर प्रा. लि. बार्शी (१९३ कोटी ४९ लाख), शिवरत्न उदयोग प्रा. लि., अकलूज (१५९ कोटी, ४५ लाख), सांगोला तालुका सहकारी कारखाना (८१ कोटी ४८ लाख) आणि शंकर तालुका सहकारी कारखाना (52 कोटी 2 लाख) या कारखान्याकडे थकबाकी आहे. नाशिक मधील निफाड सहकारी कारखाना (१४७ कोटी ४८ लाख), नाशिक सहकारी साखर कारखाना (१३६ कोटी ९२ लाख) यांच्याकडे थकबाकी आहे. वर्धा येथील सहकार महर्षी बापूराव देशमुख कारखाना (६७ कोटी ६३ लाख), स्व. बापूरावजी देशमुख सहकारी सूतगिरणी (६७ कोटी ६३ लाख) तर बुलडाणा येथील मुंगसाजी महाराज सहकारी व अनुराधा शुगर मिल्स (४१ कोटी ४१लाख) . उस्मानाबादमधील तेरणा सहकारी साखर कारखाना (२८४ कोटी), तुळजाभवानी सहकारी साखर (१२० कोटी) या कारखान्याकडे थकबाकी आहे.