राधाकृष्ण विखे यांचा गौप्यस्फोट

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते आपल्या संपर्कात आहेत. यापैकी बहुसंख्य मंडळी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत, तर काही जण शिवसेनेत जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र पक्षश्रेष्ठीच त्यांच्या प्रवेशाबाबत अंतिम निर्णय घेतील, असा दावा गृहनिर्माणमंत्री  राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे.

सोलापूरच्या भेटीवर आल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना विखे-पाटील म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची अवस्था आणखी बिकट होईल. कारण दोन्ही काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर अनेक जण नाराज आहेत. आपण देखील पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होतो. त्यामुळेच आपण स्वत: भाजपमध्ये आलो. आणखी बरीच नेतेमंडळी युतीमध्ये यायला उत्सुक आहेत. ती आली तर आश्चर्य मानायचे कारण नाही. आषाढी एकादशीनिमित्त विखे-पाटील हे सोलापूर जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आले होते, त्या वेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

काँग्रेसला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच खिंडार पडले होते. पक्षात आपण म्हणू तीच पूर्व दिशा म्हणणाऱ्या मंडळींना धक्का बसला. सोलापूर जिल्ह्य़ातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे बरेच नेते भाजप-सेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. त्यासाठी त्यांचा संपर्क वाढला आहे. राज्यात बहुतांश जिल्ह्य़ांमध्ये जवळपास अशाच राजकीय घडामोडी बघायला मिळतील, असे भाकीत त्यांनी वर्तविले.