मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला नसता तर  काँग्रेस व राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसून केवळ तोंडाची हवा सोडत बसावे लागले असते. पण त्यांच्यामुळे तुम्ही सत्तेत आलात व मंत्री झालात. आता नीट वागा नाहीतर ठाकरे कधीही राजीनामा देतील, असे मत माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केले.

जलसंधारण मंत्रीपदी शंकरराव गडाख, तर नगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राजश्री घुले यांची निवड झाल्याबद्दल नेवासे येथे ज्ञानेश्वर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात गडाख बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार नरेंद्र घुले होते. या वेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले, पांडुरंग अभंग, मुळा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख, दिलीप लांडे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष दिनकर गर्जे, काँग्रेसचे सरचिटणीस विनायक देशमुख उपस्थित होते.

या वेळी पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, उपसभापती किशोर जोजार, नगराध्यक्षा योगिता पिंपळे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

माजी खासदार गडाख म्हणाले,की काँग्रेस व राष्ट्रवादीचा मंत्री कधी चांगल्या बंगल्यासाठी तर कधी चांगले खाते मिळावे म्हणून रुसतो. दररोज काही कुरबुरी व नाराजीनाटय़ सुरु आहे. या कुरबुरी अशाच सुरु राहिल्या तर ठाकरे कधीही राजीनामा देतील, कारण ते राजकारणी नाहीत तर कलावंत आहेत. त्यांना मी जवळून पाहिले आहे. बाळासाहेब ठाकरे असल्यापासून मी त्यांना ओळखतो. शब्द पाळणारा हा माणूस आहे. त्यामुळे काँग्रेस—राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदी थांबायला हवी, असे सांगत गडाख यांनी दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांना सुधारण्याचा सल्ला दिला. महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडेही आपण भावना व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.

कलावंत असलेल्या ठाकरे यांचे मानसिक व वैचारिक स्वास्थ्य चांगले रहावे म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादीने शहाणपणाने वागायला हवे. ग्रामीण भागातील तसेच बहुजनांचे सरकार सत्तेत आले आहे. शहरी लोकांचे सरकार गेले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची हे सरकार चालावे, अशी इच्छा आहे. त्यामुळे मंत्र्यांना बंगले, कार्यालय, थाटमाट कशासाठी हवा? त्यांनी मुंबईतील बंगल्यात रहाण्याऐवजी ग्रामीण भागातील लोकात रहायला हवे, असे सांगण्याची आता वेळ आली आहे. किरकोळ कारणांसाठी अट्टाहास करत नाराज होऊ  नका. संधी मिळाली त्याचे सोने करा. तिन्ही पक्षाचे मंत्री एकसंध राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख म्हणाले,की राजकारण हे खूप अवघड असते. त्याचे चटके अनेकांना सहन करावे लागतात. मलादेखील त्याची झळ सोसावी लागली. क्रांतिकारीकडून लढायचे की अपक्ष असा विचार सुरु असतांना काँग्रेस, भाजपा व राष्ट्रवादी संपर्क करत होते. भाजपा तर हात धुवून मागे लागला होता. भाजपाची ऑफर आली होती, त्या वेळी घरी बसू पण भाजपात जाणार नाही, असे ठरविले होते. सत्ताधारी पक्षाचा आमदार किती त्रास देऊ  शकतो हे अनुभवले. मात्र आता नामदार झालो असलो तरी विरोधकांना त्रास देणार नाही. झाले गेले विसरुन जा. आकस ठेवणार नाही. साऱ्यांना माफ केले, असे ते म्हणाले.

अडचणीच्या काळात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होतो. त्यांनी मला धीर दिला. मंत्रिपदाची संधी दिली. विरोधकांनी त्यांच्या जवळची माणसे दूर नेऊ न घातली. देवाचे नाव घेऊ न काही होत नसते. त्याकरिता नियत साफ लागते. आता विरोधकांवर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे. राज्यात प्रभावीपणे काम करु, असे ते म्हणाले.

माजी आमदार नरेंद्र घुले यांनी, जनतेला आपल्या ताटात माती कालवणारा माणूस नको असतो. राजकीय ताकदीच्या माध्यमातून पोलिसांचा वापर करुन दडपशाही करणाऱ्यांची सत्ता टिकली नाही. घुले—गडाख यांच्यात कटूता आली होती. त्याची झळ दोन्ही तालुक्यांना बसली. आता ते एकत्र आल्याने दोघेही नामदार झाले. गडाख यांनी घाटमाथ्यावरील पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले, पांडुरंग अभंग, विनायक देशमुख यांचे भाषण झाले. प्रास्ताविक मुळा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी केले.

प्रशांत गडाखांसारखा भाऊ  असावा

मंत्री शंकरराव गडाख यांना प्रशांत गडाख यांच्यासारखा भाऊ  मिळाला आहे. भावाच्या निर्णयाची जबाबदारी घेऊ न ती पार पाडण्यासाठी मनापासून प्रयत्न करत पाठबळ देऊ न लढ म्हणणारा भाऊ  मिळायला नशीब लागते, असे माजी आमदार नरेंद्र घुले यांनी सांगितले. ज्यांना मंत्रिपद दिले, विरोधी पक्षनेतेपद दिले, ते सगळे काही मिळाले तरी अकोल्याच्या लोकांना सोडून दुसऱ्या पक्षात गेले. लोकांना विसरले की काय होते हे पिचडांची अवस्था पाहून समजते, असे घुले म्हणाले.