कोणत्याही निवडणुकांत यापूर्वी काँग्रेसच्या सभा झाल्यानंतर त्यांना मते मिळायची आता मात्र, काँग्रेसच्या सभाही होत नाहीत आणि झाल्याच तर त्यानंतर त्यांना मतेही मिळत नाहीत, अशी खोचक टीका भाजपा नेते माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, की भाजपा पश्चिम महाराष्ट्राला असहकार्य करते अशी ओरड करण्याआधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे. आपल्या सत्तेच्या काळात आपण नेमके काय केले हे आरशात पाहावे. प्रचंड ताकद आणि संपूर्ण सत्ता असताना, इथल्या ग्रामीण भागाची अवस्था काय? कोरडवाहू भागातील जनतेला काय न्याय दिला? कृष्णाचे हक्काचे पाणी आपण अडवू शकला का? असा सवाल करून भंडारी यांनी आघाडी सरकारच्या कारभाराची वाभाडे काढले. जिल्हा मध्यवर्ती बँकांना पाचशे, हजाराच्या नोटा बदलाच्या प्रक्रियेपासून लांब ठेवल्याबाबत ते म्हणाले, राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांचे वाटोळे झाले आहे. बहुतांश बँका अवसायानात आल्या आहेत. या बँकांची जबाबदारी ना रिझव्‍‌र्ह बँक, ना नाबार्ड घ्यायला तयार नाही.  एमआयएमचे राजकारण हे कोणत्याही सुसंस्कृत वा लोकशाही देशाला न मानवणारे आहे. आणि अशा पक्षाशी कोणी भाजपाचा संबंध जोडत असेल, तर त्या काँग्रेसच्या नेत्याच्या बुद्धीची कीव येत असल्याची खंत व्यक्त करून, भंडारी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेधही नोंदवला. राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निम्म्याहून अधिक नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष असेल तर, एकूण सरासरीमध्ये भाजपाचेच सर्वाधिक नगरसेवक असतील, असा दावा त्यांनी केला. माजी मुख्यमंत्र्यांच्या कराडमध्ये काँग्रेसची निशाणी अथवा कोणत्याही फलकावर काँग्रेस हे नाव दिसत नसल्याकडे लक्ष वेधताना, पृथ्वीराज चव्हाण यांनाही भंडारी यांनी लक्ष्य केले. कराडचा नगराध्यक्षही भाजपाचाच असेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना लक्ष्य करून, चव्हाणांनी भाजपाचा एमआयएमचा संबंध जोडल्याच्या वक्तव्याचा निषेध केला. पृथ्वीराज चव्हाणांसारख्या व्यक्तिमत्त्वाने असे अविचारीपणाने बोलणे त्यांना शोभत नसल्याची टीका त्यांनी केली. डॉ. अतुल भोसले यांनी भाजपाच्या विजयाचा दावा केला.