28 February 2020

News Flash

सदाभाऊंना पहिला झटका !

काँग्रेस, राष्ट्रवादी व शेट्टी हे एकत्र आले आणि जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत सदाभाऊंना झटका दिला

खासदार शेट्टी यांना आपली राजकीय उपद्रव मूल्य दाखविण्यासाठी हा विजय गरजेचा होता

जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शेट्टी एकत्र

राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे परस्परांपासून अधिकृतपणे दूर गेले आणि जिल्ह्य़ातील राजकारणात त्याचे पडसाद उमटू लागले. भाजपच्या जवळ गेलेल्या खोत यांना शह देण्याकरिता मग काँग्रेस, राष्ट्रवादी व शेट्टी हे एकत्र आले आणि जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत सदाभाऊंना झटका दिला.

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत भाजपासह काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येउनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुरेखा आडमुठे यांनी बाजी मारून विजय मिळविला. यामागे वाळव्यातील बदलत्या राजकीय फेरमांडणीचा आडाखा जसा आहे, तसा शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील संघर्षही कारणीभूत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत ही जुळणी तीव्रतेने समोर आली तर नवल नाही, मात्र यानिमित्ताने राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांची कूटनिती पुन्हा एकदा सर्व पक्षिय नेत्यांच्या निदर्शनास आली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

जिल्हा नियोजन समितीच्या २७ पकी १३ जागा अविरोध निवडण्यात आल्या. मात्र जिल्हा परिषदेच्या ६० सदस्यांतून निवडून द्यायच्या १४ जागांसाठी एकमत न झाल्याने निवडणूक झाली. या १४ जागा अविरोध करण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह जिल्हा परिषदेच्या सत्तेत सहभागी असलेल्या राज्यमंत्री खोत आणि आ. शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील रयत विकास आघाडी, अजितराव घोरपडे यांच्या स्वाभिमानी विकास आघाडी यांच्यात एकमत झाले होते. यासाठी महाआघाडीच्या वतीने १४ जागांसाठी उमेदवारही जाहीर करून मतदानासाठी आवश्यक असलेला सदस्यांचा कोटाही निश्चित करण्यात आला.

मात्र, या उमेदवार निवडीत एकमेव सदस्य असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विश्वासात न घेता गृहीत धरून श्रीमती आडमुठे यांच्या उमेदवारीकडे डोळेझाक केली. नेमका याच स्थितीचा लाभ घेत खासदार शेट्टी यांनी राज्यमंत्री खोत यांच्या समर्थक उमेदवार श्रीमती सुरेखा जाधव यांचा पराभव करीत राजकीय चमत्कार घडविला.

नियोजन समितीच्या एका जागेवर स्वाभिमानीच्या आडमुठे यांचा विजय झाला म्हणून भाजपाच्या अथवा राष्ट्रवादीच्या हातात असलेल्या सत्ताकारणाला फार मोठा धक्का बसणार नसला तरी यामुळे एक मात्र दिसून आले की, भविष्यातील राजकारण कोणत्या दिशेने जाणार आहे याची चुणूक दिसली. शेट्टी यांनी ही निवड प्रतिष्ठेची करीत एकीकडे भाजपाला शह देत असताना मुख्य लक्ष्य हे राज्यमंत्री खोत यांच्या उमेदवाराचा पाडाव करणे, यात जिल्हय़ातील सर्वपक्षीय नेते मंडळींचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध असल्याचे दिसून येत आहे.

सर्वच दिग्गज नेते एकत्र आले असताना रयत विकास आघाडीच्या उमेदवारांसाठी मतांचा कोटा निश्चित करीत असताना रयतचे अन्य तीन सदस्य सुषमा नायकवडी, जगन्नाथ माळी आणि निजाम मुलाणी यांना अन्य उमेदवारासाठी निवडण्यात आले, मात्र रयतच्या श्रीमती जाधव यांच्यासाठी राष्ट्रवादीचे ४ सदस्य देण्यात आले. इथेच खोतांच्या उमेदवाराचा पराभव निश्चित करण्यात आला. यामागे योगायोग निश्चित नव्हता, तर जाणीवपूर्वक राज्यमंत्री खोत यांना धक्का देण्याचे तंत्र होते. आणि हे यशस्वी करीत असताना याचे काँग्रेस अंतर्गत असलेल्या विशाल पाटील यांच्या गटाची साथ शेट्टींच्या स्वाभिमानीला होणार हे गृहीत धरून ही खेळी करण्यात आली.

वाळव्यात राज्यमंत्री खोत आपला गट बांधणीच्या तयारीत आहेत. यासाठी होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे रणमदान सुरू आहे. तालुक्यातील ८० हून अधिक ग्रामपंचायतीत निवडणुकीची धामधूम सुरू असून खोत यांना एकाच वेळी शेट्टी यांच्या स्वाभिमानीशी दोन हात करीत असतानाच प्रस्थापित असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदार जयंत पाटील यांच्या गटाशी लढा द्यावा लागत आहे. खोत यांचा पाया विस्तारण्याचा प्रयत्न गावपातळीवरच रोखण्याचे प्रयत्न करीत केले जात आहेत हे स्पष्ट दिसत आहे.

याचे परिणाम वाळवा आणि शिराळा तालुक्यात दिसतील अशी चिन्हे आहेत. कारण भाजपाचे आमदार शिवाजीराव नाईक यांना शह देण्यासाठी शिराळ्यात माजी आमदार मानसिंगराव नाईक यांना सर्वेतोपरी मदत आमदार पाटील करीत आहेत.   लोकसभेसाठी खासदार शेट्टी यांना वाळवा, शिराळ्यातील मतदारांची जुळणी करावी लागणार असून यासाठी आतापासूनच त्यांची तयारी करण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रवादीची पडद्याआडची मदत त्यांना हवीच आहे त्याची चुणूक यानिमित्ताने दिसली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

राजकीय आडाखे काही असले तरी ही नियोजन मंडळाची एक जागा फार मोठा सत्तेचा सोपान नसला तरी नेत्यांच्या भूमिका कशा बदलू शकतात हे लक्षात आले. वाळव्यात नगराध्यक्ष निशिकांत पाटील हे आगामी विरोधक म्हणून आमदार पाटील यांच्यासमोर येणार असल्याचे गृहीत धरीत राज्यमंत्री खोत यांची ताकद रोखण्याचे प्रयत्न यानिमित्ताने दिसून आले. आमदार जयंत पाटील यांनी स्वाभिमानीच्या नथीतून राज्यमंत्री खोत यांच्या उमेदवाराचा केलेला पाडाव ही वाळव्यातील राजकीय गरज होती तशी खासदार शेट्टी यांना आपली राजकीय उपद्रव मूल्य दाखविण्यासाठी हा विजय गरजेचा होता. दोघांनीही ही गरज साध्य केली असली तरी ग्रामपंचायतीच्या फडात आता खोत कोणता कार्यक्रम घेऊन सामोरे जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

First Published on September 9, 2017 3:05 am

Web Title: congress ncp raju shetty join hand for district planning committee election
Next Stories
1 ताडोबातील वन्य प्राण्यांना यंदा पाणीटंचाईची झळ
2 बी टी कापसावरही आळीचा प्रादुर्भाव 
3 कर्नाटकात जीप-बसचा भीषण अपघात, सोलापुरातील सहा जणांचा जागीच मृत्यू
Just Now!
X