|| नीलेश पवार

नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक :- विधानसभा निवडणुकांनंतरचे कवित्व आणि त्यासोबत जिल्ह्य़ातील बडय़ा नेत्याचे पक्षांतर जिल्हा परिषदेतील सत्तेचे गणित ठरवणार आहे. जिल्हा परिषदेवर सध्या काँग्रेसची सत्ता असली तरी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा काँग्रेसमधून सेनेत झालेला प्रवेश आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते डॉ. विजयकुमार गावित देखील भाजपवासी झाले असल्याने यानंतर पहिल्यांदाच होऊ घातलेली ही निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी कसोटी पाहणारी आहे.

जिल्हा परिषदेवर स्थापनेपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्राबल्य राहिले आहे. गेल्यावेळी काँग्रेसने  वर्चस्व राखले. मात्र काँग्रेसचे जिल्हा परिषदेतील सारथी असलेले माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल झाल्याने ही सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

रघुवंशी यांचा जिल्ह्य़ात संपर्क असल्याने आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत त्याचा लाभ सेनेला होणार असल्याचे मानले जाते. मात्र नवापूर आणि अक्कलकुवा मतदार संघात काँग्रेसने मिळवलेला निसटता विजय त्यांच्यासाठी धोक्याची घंटा देणारा आहे. मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीत असलेले डॉ. विजयकुमार गावित आता भाजपमध्ये डेरेदाखल झाले आहेत. त्यामुळे पाच वर्षे त्यांच्यासोबत छुप्या पध्दतीने फिरणारे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद पदाधिकारी आता भाजपवासी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात राष्ट्रवादीची बिकट अवस्था झाली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेद्र गावित यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये उडी घेतली. तर राष्ट्रवादीचा दुसरा चेहरा मानल्या जाणाऱ्या शरद गावितांनीही काँग्रेस उमेदवाराविरोधात अपक्ष निवडणूक लढवत आघाडीचा धर्म पाळला नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होईल का, याबद्दल साशंकता आहे.

विधानसभा निवडणुकांमध्ये युतीचा धर्म पाळत चंद्रकात रघुवंशी आणि डॉ. विजयकुमार गावित एकत्र आल्याने नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र राज्यातील सत्ता स्थापनेत भाजप-सेनेत निर्माण झालेली तेढ उभयतांच्या मैत्रीच्या समीकरणावर पाणी फेरणारी ठरू शकते.

काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या शहादा आणि तळोदा विधानसभा मतदार संघात भाजपने विजय मिळविलेला आहे. सर्वाधिक १४ गण शहादा तालुक्यात आहेत. काँग्रेसच्या दीपक पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. नवापूर मतदारसंघात शिरीष नाईक विजयी झाले असल्याने सध्या तरी काँग्रेसला या तालुक्यातुन कुठलाही धोका वाटत नाही. भाजपमध्ये गेलेले भरत गावित आणि राष्ट्रवादीचे बंडखोर शरद गावित काय भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष आहे. नंदुरबारमध्ये रघुवंशी आणि गावित परिवाराचा मनोमिलाफ असल्याने ‘तेरी भी चूप आणि मेरी भी चूप’ या पध्दतीने सर्वकाही ठरण्याची शक्यता आहे. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात गेल्या निवडणुकीत भाजपा आणि सेनेचे वाढलेले प्राबल्य आणि यंदाच्या निवडणुकीत के. सी. पाडवी यांचा झालेला निसटता विजय काँग्रेसची डोकेदुखी वाढवणार आहे.

सध्याचे बलाबल

नंदुरबार जिल्हा परिषद – एकूण जागा ५५

काँग्रेस २९

राष्ट्रवादी  २४

भाजप एक

अपक्ष एक