डान्सबार बंदीच्या मागणीसाठी बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदारांनी नागपूरमध्ये विधीमंडळाच्या इमारतीबाहेर निदर्शने केली. डान्सबार बंदी झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी महिला आमदारांकडून देण्यात आल्या.
काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड, दीप्ती चवधरी, राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांच्यासह इतरही महिला आमदार या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्या होत्या. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात बाजू प्रभावीपणे न मांडल्यामुळे डान्सबारवरची बंदी उठविण्यात आल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. डान्सबारमुळे अनेकांचे संसार उदध्वस्त झाले आहेत. त्यामुळे सरकारने डान्सबार बंदी केलीच पाहिजे, अशी मागणी यावेळी सुमन पाटील यांनी केली.
राज्याच्या विविध भागात डान्सबार, मटकासह विविध अवैध धंदे सुरू आहेत. शासनाने तातडीने नवीन कायदा करून डान्सबार बंद करण्यासह अवैध व्यवसाय बंद करावे, या मागणीसाठी सुमन पाटील यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर मंगळवारी उपोषण केले होते.