रोकडरहित अर्थव्यवस्थेच्यादृष्टीने मोदी सरकारकडून उद्घाटन करण्यात आलेल्या ‘भीम अॅप’ला काँग्रेसकडून विरोध करण्यात आला आहे. ‘भीम’ अॅप जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाशी संबंधित असेल, तर असे एकेरी नाव घेता येणार नाही. आम्ही नरेंद्र मोदी यांचा निषेध करतो, अशा शब्दांत माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी सरकारवर टीका केली. स्मार्टफोन किंवा अगदी साधा फोन असणारा मोबाइल आणि अंगठय़ाचा ठसा एवढीच आवश्यकता असणारे ‘भीम’ नावाच्या आधार क्रमांकावर आधारलेल्या पेमेंट अ‍ॅपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठवड्यात उद्घाटन केले होते. ‘भारत इंटरफेस फॉर मनी’ असे या अ‍ॅपचे खरे नाव. पण त्यावरून ‘भीम’ असे राजकीयदृष्टय़ा सूचक असणारे नामाभिधान मोदींनी केले आणि प्रतिष्ठेच्या केलेल्या ‘लेस कॅश’ मोहिमेला थेट राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला. या वेळी मोदींनी बाबासाहेबांच्या आर्थिक क्षेत्रातील कामगिरीचा आवर्जून उल्लेख केला. रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्थापनेमधील आंबेडकरांच्या योगदानाकडेही त्यांनी लक्ष वेधले होते.
मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अशाप्रकारे एकेरीत उच्चारणे अयोग्य असल्याचे सांगत मोघे यांनी अॅपच्या नावावर आक्षेप घेतला. सरकारच्या नोटाबंदीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने ६ ते ८ जानेवारीला होऊ घातलेल्या राज्यव्यापी आंदोलनाची तयारी करण्यासाठी शिवाजीराव मोघे बुलढाण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना मोघेंनी ही भूमिका मांडली. यावेळी मोघे यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरही टीका केली. नोटाबंदीचा प्रयोग हा तयारीविना आणि हेकेखोरपणाचा असून त्याचा त्रास सर्वांनाच झालेला आहे. या बाबतीत किती यातना झालेल्या आहेत आणि आता याही पुढे होणार आहे. या बाबतीत काँग्रेस जनजागरण करणार आहे, अशी माहिती मोघे यांनी दिली.

दरम्यान, मोदींनी भीम अॅपचे उद्घाटन केल्यानंतर अवघ्या ४८ तासांत हे अॅप क्रमांक एकवर पोहचले होते. गुगल प्ले स्टोअरवर इतक्या कमी वेळात सर्वाधिक डाउनलोड होणारे हे पहिले भारतीय अॅप ठरले आहे. गेल्या ४८ तासांमध्ये या अॅपला सर्वाधिक रिव्ह्यू मिळाले आहेत. आतापर्यंत या अॅपला ८६,००० रिव्ह्यू मिळाले असून या अॅपची रेटिंग ही ४.१ आहे. सध्या भीम अॅप हे केवळ अँड्रॉइडवर आहे. काहीच दिवसांमध्ये हे अॅप अॅपलवर देखील येणार आहे. नजीकच्या काळात देशातील सारे व्यवहार या अ‍ॅपवरून होण्याचा दावा मोदींनी केल्याने पेटीएम, मोबीक्विक, फ्रीचार्ज, एसबीआयबीडी यासारख्या खासगी ‘ई-वॉलेट’ना चांगलेच आव्हान मिळण्याची शक्यता आहे.