स्थानिक संस्था कर रद्द केल्यावर शासन मूल्यवर्धित करावर अधिभार लावणार आहे. परंतु, यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांवर नाहक बोजा पडणार असून त्यास काँग्रेसचा विरोध असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.
शनिवारी नाशिक जिल्हा स्वातंत्र सैनिकांचा मेळावा चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. ज्येष्ठ मार्क्‍सवादी नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा अद्याप थांगपत्ता लागू शकलेला नाही. ही भाजप-सेना सरकारची नामुष्की असल्याचे त्यांनी
सांगितले.
स्थानिक संस्था कर रद्द करताना मूल्यवर्धित करावर अधिभार लावण्याचा पर्याय काँग्रेस शासनासमोरही होता. परंतु, यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांवर नाहक बोजा पडणार आहे. स्थानिक संस्था कर हा शहरी भागातील नागरिकांचा कल होता. परंतु, मूल्यवर्धित करात अधिभार लावल्यास ग्रामीण भागास नाहक भरुदड पडणार आहे. यामुळे हा अधिभार लावण्यास काँग्रेसचा विरोध राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यात दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न कर्जाचे पुनर्गठन करून सुटणार नाही.
त्यांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची आवश्यकता असून शासनाने त्या अनुषंगाने निर्णय घ्यावा अशी मागणी चव्हाण यांनी केली. केंद्र व राज्यात सत्तेवर येताना भाजपने अनेक आश्वासने दिली होती. ही आश्वासने पूर्ण करावीत, अशी मागणी त्यांनी केली. सिंहस्थ कुंभमेळा योग्य पद्धतीने पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.