काँग्रसतर्फे १६ जूनला आर्णीत ‘चाय की चर्चा’
तब्बल ७० कोटींची उधळपट्टी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाभाडी येथे ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आश्वासनांचे गाजर दाखविले होते. त्या आश्वासनांच्या विस्मरणाच्या परिणामत: २०१५ मध्ये देशात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. लोकसभेत ४२ प्रचारसभा घेणाऱ्या मोदींनी दुष्काळी परिस्थितीत राज्याकडे पाठ फिरविल्याने त्यांना दाभडीचे स्मरण करून देण्यासाठी कॉंग्रेसने १६ जूनला आर्णी येथे ‘चाय की चर्चा’ आयोजित केली असल्याची माहिती कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे व नरेश पुगलिया यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
आज राज्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत आहे. अशा स्थितीत पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी ते महाराष्ट्रात फिरकले सुध्दा नाही. त्यांना शेतकऱ्यांचे पूर्णत: विस्मरण झालेले आहे. त्या आश्वासनाचे स्मरण करून देण्यासाठी म्हणून ‘चाय की चर्चा’ आयोजित केली आहे. आर्णीतील बालाजी जिनिंगमध्ये सकाळी ११ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग, खासदार राजबब्बर, अ.भा. युवक कॉंग्रेस अध्यक्ष अमरिंदरसिंग राजा ब्रार, प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदत उपस्थित राहणार आहेत.
अध्यक्षस्थानी प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण राहणार असल्याची माहिती दिली. आज केंद्र व राज्यात भाजपची सत्ता असून नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते काहीच बोलत नाहीत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च व ५० टक्के नफा देण्याची घोषणा त्यांनी केली होती, पण यंदा कापसाची आधारभूत किंमत केवळ ६० रुपये वाढविल्याने शेतकऱ्यांची अक्षरश: खिल्ली उडवली आहे. आज एकही राष्ट्रीय बॅंक शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार नाही. पेरण्याची वेळ आली, पण हाती पैसा नाही. अशी भीषण अवस्था शेतकऱ्यांची आहे. त्यांना स्वस्त दरात मुबलक वीज मिळणार होती. मात्र, आज आठ तास भारनियमन आहे, त्यामुळे सिंचन नाही. मोदींनी दाभडीत ज्या शेतकऱ्यांची भेट घेऊन आश्वासने दिली होती त्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हे वास्तव आहे.
राजीव गांधी जीवनदायी योजनेचे नाव बदलण्याचा प्रकार तर अधिक संतापजनक आहे. कॉंग्रेस शाहु-फुले-आंबेडकर यांचे विचारधारेवर राहिली आहे. मात्र, भाजपला आजच या महापुरुषांची आठवण होत आहे. आज बियाणे व खतांचे दर अस्मानाला भिडले आहेत.
अशा स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या जखमांवर मीठ चोळणे सुरू असल्याचा आरोपही मोघे यांनी यावेळी केला.

‘हंसराज अहीरांकडून लोकांची दिशाभूल’
केंद्रीय खते व रसायनमंत्री हंसराज अहीर खोटे बोलून लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही मोघे व पुगलिया यांनी केला. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वेकोलित जमीन गेली तर पडित जमिनीला ६ लाख, कोरडवाहू जमिनीला ८ लाख व ओलिताखालील जमिनीला १० लाख रुपये प्रती एकर भाव देण्याचा निर्णय २२ ऑगस्ट २०१२ रोजी घेतला होता. आज हंसराज अहीर आपणच हा निर्णय घेतल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करीत आहेत. निम्म पैनगंगा सिंचन प्रकल्पामुळे चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्य़ातील ८८ टक्के जमीन सिंचनाखाली येत असतांना केंद्रीय मंत्री अहीर यावर एक शब्दही बोलत नाहीत किंवा हा प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून साधे प्रयत्नही करीत नाहीत, अशीही टीका केली.

मोदींच्या आश्वासनांचा समाचार घेऊ
या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी जनतेला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यात येणार असून जनतेने सत्ता देऊनही त्यांनी आश्वासनांची पूर्तता का केली नाही? ती कधी करणार, याविषयी जाब विचारला जाणार आहे. तेव्हा या कार्यक्रमाकरिता शेतकऱ्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यवतमाळ येथील पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री वसंतराव पुरके, जि.प. सभापती नरेंद्र ठाकरे, माजी आमदार विजयाताई धोटे, नगराध्यक्ष आरीज बेग व अरुण राउत यांनी केले.