रमजान महिन्यातच सुरू झालेले वीज भारनियमन, पेट्रोल व डिझेल दरात झालेली वाढ आणि कांद्याचे कोसळलेले भाव याच्या निषेधार्थ गुरुवारी येथे काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराविरोधात घोषणा देत मोर्चा काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रास्ता रोकोही केला.
डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ झालेल्या जाहीर सभेत केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका करण्यात आली. माजी आमदार अनिल आहेर यांनी राज्य सरकारने दोन वर्षांत ‘अच्छे दिन’चे आमिष दाखवीत सर्वसामान्य जनतेला बुरे दिन दाखविल्याचा आरोप केला. जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले. डिझेल, पेट्रोल दरांत वाढ करण्यात आली. दुसरीकडे शेतीमाल व कांद्याच्या दरात घसरण झाली. उत्पादन खर्च निघत नसल्याने तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढल्याचेही आहेर यांनी नमूद केले. इतर पदाधिकाऱ्यांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मनमाड शहर अध्यक्ष अफजलभाई शेख, प्रकाश गवळी, रहेमान शाह आदी या वेळी उपस्थित होते.