|| प्रशांत देशमुख

राहुल गांधी सेवाग्राम आश्रमातून करणार पदयात्रेचे नेतृत्व

महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक २ ऑक्टोबरला सेवाग्रामला होत आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक गांधीभूमीत होत आहे.

राहुल गांधी यांच्या वर्धा दौऱ्यावर आज शिक्कामोर्तब झाले. २ ऑक्टोबरला सेवाग्राम आश्रमात होणाऱ्या प्रार्थनेत राहुल गांधी सहभागी होणार आहेत. यानंतर कार्यकर्त्यांच्या पदयात्रेचे ते नेतृत्व करतील. त्यानंतर होणाऱ्या कार्यकारिणीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान ते भूषविणार आहे. आमदार रणजीत कांबळे यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून पदयात्रा व जाहीर सभेचा तपशील अद्याप ठरायचा असल्याचे त्यांनी सागितले.

इंग्रजांना ‘भारत छोडो’चा इशारा देण्याची भूमिका याच भूमीत १४ जुलै १९४२ रोजी ठरली होती. ‘वर्धा ठराव’ म्हणून स्वातंत्र्य लढय़ाच्या इतिहासात त्याची नोंद आहे. गांधीजींना कार्यकारिणीच्या सदस्यांना सेवाग्रामला बोलावून त्यावर शिक्कामोर्तब केले होते. पुढे ऑगस्ट १९४२ मध्ये मुंबईला झालेल्या अधिवेशनात ‘भारत छोडो’च्या घोषणेवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले.

आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर २ ऑक्टोबरला सेवाग्राममध्ये होणाऱ्या कार्यकारिणी बैठकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीसाठीचे काँग्रेसचे धोरण सेवाग्राममध्येच ठरेल. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा गांधीजींच्याच मार्गदर्शनात सेवाग्रामला तयार झाला होता. त्या वेळी काँग्रेसला सर्वाधिक प्रांतात यश मिळाले होते. जवळपास ७५ वर्षांनंतर काँग्रेस कार्यकारिणी बैठक येथे होत आहे.

गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त शासन पातळीवर विविध कार्यक्रम होत असताना गांधीजींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सेवाग्राममध्ये कार्यकारिणीचे आयोजन करून काँग्रेसनेही गांधीजींचा पक्षाशी असलेले नातेसंबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे.