अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

प्रबोध देशपांडे, अकोला</strong>

काँग्रेसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात लढायचे नाही. त्यामुळेच त्यांनी आमच्याशी आघाडी केली नाही. काँग्रेस ‘आरएसएस’ची बी टीम आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला. मला पाडण्यासाठी शरद पवारांसह अनेक नेत्यांचा कांगावा सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

अकोला लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अ‍ॅड. आंबेडकरांनी आज मंगळवारी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी युती व आघाडीच्या भूमिकेवर चौफेर टीकास्त्र सोडले.

ते म्हणाले, काँग्रेसला संघाचा विरोध करायचा नाही. काँग्रेसने अकोल्यात दिलेल्या उमेदवारावरून हे सिद्ध होते. संघाने अर्धी काँग्रेस आपल्या ताब्यात घेतली. संघासोबत काँग्रेसने ठरवून केलेला हा खेळ आहे. वंचितांना सत्तेत न येऊ देण्यासाठी मला पाडण्याचे षडयंत्र आहे. वंचितांचा म््होरक्या म्हणजे मी पडलो पाहिजे, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मी लोकसभेत गेल्यास १९९२ मध्ये दाऊदला फोन कोणी केला, याचे गूढ देशासमोर येईल, याची भीती शरद पवारांना आहे. त्यामुळेच मला पराभूत करण्यासाठी पवारांसह अनेक नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. धनगरांनी पंढरपुरात उठाव केला, तो वाया जाऊ नये म्हणून सोलापूर मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले.

गडकरींचा तीन लाखांनी पराभव होईल

आदिवासी, हलबा, मुस्लीम, बौद्ध आदी भाजपच्या विरोधात आहेत. आदिवासींवर अन्याय झाला. त्यामुळे नागपूर मतदारसंघात नितीन गडकरींचा तीन लाख मतांनी पराभव होईल. गडकरींनी २०० कोटी रुपये वाटले, तरी ते निवडून येऊ शकत नाहीत, असेही आंबेडकर म्हणाले.

‘ती’ भूमिका जाती अंताच्या लढय़ाचा भाग

वंचित बहुजन आघाडीच्या यादीमध्ये उमेदवारांच्या नावापुढे जातीचा उल्लेख आहे. यावरून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांवर टीकाही झाली. यावर वंचित आघाडीची ती भूमिका जाती अंताच्या लढयाचा एक भाग असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेने भाजपसोबत लग्न का केले?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडी म्हणजे निवडणुकीपुरत्या उगवलेल्या छत्र्या असल्याची टीका केली. याकडे लक्ष्य वेधले असता आंबेडकर म्हणाले, शिवसेनेला आतापर्यंत भाजप पसंत नव्हते. तरी पण शिवसेनेने भाजपसोबत लग्न का केले, याचा खुलासा प्रथम उद्धव ठाकरेंनी करावा.

काँग्रेस सदैव आरएसएसच्या विरोधात राहिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येत संघाचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात खटला दाखल आहे. त्यामुळे आंबेडकरांचे आरोप चुकीचे आहेत. काँग्रेसची अ‍ॅड. आंबेडकरांसोबत आघाडी करण्याची पूर्ण तयारी होती.

– डॉ. सुधीर ढोणे, प्रदेश प्रवक्ता, काँग्रेस.