22 November 2019

News Flash

सोलापूरमध्ये काँग्रेसचा पाय खोलात!

लोकसभेपाठोपाठ बाजार समितीमधीलही सत्तेची सूत्रे भाजपच्या हाती

|| एजाज हुसेन मुजावर

लोकसभेपाठोपाठ बाजार समितीमधीलही सत्तेची सूत्रे भाजपच्या हाती

सोलापूर जिल्ह्य़ात सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभेच्या जागा भाजपने ताब्यात घेत दोन्ही काँग्रेसची ताकद क्षीण केल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधकांची वाट बिकट आहे. राज्यात चौथ्या स्थानावर असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत दोन्ही काँग्रेसचे बहुमत असताना तेथील सत्ता गमावली आहे. बाजार समितीच्या ५६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भाजपने सत्तेची सूत्रे स्वत:च्या ताब्यात घेतली आहेत. या घडामोडीत अंतर्गत कुरघोडय़ांच्या राजकारणात दोन्ही काँग्रेसच्या ताब्यातून भाजपच्या ताब्यात सत्ता गेली आहे. या घडामोडी पाहता लोकसभेच्या दारुण पराभवानंतर जागे होण्याऐवजी पुन्हा कुरघोडय़ांच्या चिखलात रुतलेल्या काँग्रेस पक्षाचे पाय खोलात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोलापूर जिल्ह्य़ात मागील पाच वर्षांत सत्ताधारी भाजपमध्ये पालकमंत्री विजय देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यातील टोकाला गेलेल्या गटबाजीचा पुरेपूर लाभ काँग्रेसने उठविणे अपेक्षित होते. परंतु काँग्रेसला विरोधी पक्ष म्हणून कधीही ठोस जबाबदारी सांभाळता आली नाही. उलट, भाजपमध्ये कितीही गटबाजी असली तरी त्याचा पक्षाच्या बांधणीवर कधीही परिणाम तर झालाच नाही. सध्याचा काळच भाजपचा राहिला आहे. त्यामुळे कोणतेही कष्ट न घेता सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीची सत्ता भाजपच्या वर्चस्वाखाली सहजपणे आली आहे. यात वरकरणी स्थानिक काँग्रेसमधील गटबाजी दिसत असली तरी प्रत्यक्षात या पक्षाच्या नेत्यांची हतबलता स्पष्ट होते. यानिमित्ताने आयती संधी मिळून बाजार समितीचे सभापती झालेले पालकमंत्री विजय देशमुख यांची स्थानिक राजकारणावरील मांड आणखी पक्की झाली आहे. खरे तर राज्याचे मंत्री असलेल्याने नेत्याने एखाद्या बाजार समितीचे सभापतिपद स्वत:कडे घ्यावे, हे वरकरणी योग्य वाटत नाही. परंतु येथे पालकमंत्री देशमुख यांना आपला राजकीय पाया आणखी मजबूत करायचा आहे.

बाजारसमितीमधील सत्तेचे महत्त्व

सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समिती ही राज्यात नवी मुंबई, पुणे व नागपूरनंतर चौथ्या क्रमांकाची समजली जाते, वार्षिक आर्थिक उलाढाल १२०० कोटींच्या घरात असलेल्या या बाजार समितीवर पारंपारिकपणे काँग्रेस व राष्ट्रवादीचेच वर्चस्व राहिले. सुभाष देशमुख हे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री झाले. त्यातूनच त्यांचे लक्ष दिलीप माने यांच्या ताब्यातील सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीकडे होते. मग चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. दिलीप माने यांच्यासह इतरांवर कोटय़वधींचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात आली. मग न्यायालयीन लढाई झाली. या परिस्थितीत दिलीप माने यांनी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांचे पक्षांतर्गत राजकीय शत्रू राहिलेले पालकमंत्री विजय देशमुख यांची ‘शत्रूचा शत्रू आपला मित्र’ या न्यायाने जवळीक साधली. एवढेच नव्हे तर बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक लागली तेव्हा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्वत:चे पॅनेल उभे केले तेव्हा दिलीप माने यांनी सुभाष देशमुख यांचे आव्हान परतवून लावण्यासाठी आपल्या पॅनेलमध्ये थेट पालकमंत्री विजय देशमुख यांनाच सामावून घेतले. शेवटी अपेक्षेप्रमाणे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेल पराभूत झाले.

या पाश्र्वभूमीवर लोकसभा निवडणुकांपाठोपाठ विधानसभा निवडणुकांची तयारीही सुरू झाली तेव्हा मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी दिलीप माने यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना थेट आव्हान देण्याची जोरदार तयारी चालविली होती. त्यासाठी बेरजेचे राजकारण महत्त्वाचे होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत दिलीप माने यांनी सभापतिपदाची सूत्रे सोडली. सभापतिपदी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांची नियुक्ती करण्यात येणार होती. त्यासाठी पक्षाचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी लक्ष घातले होते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बळीराम साठे यांनी आपले चिरंजीव जितेंद्र साठे यांना सभापतिपदाची संधी मिळावी म्हणून थेट पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना साकडे घातले होते. अशा प्रकारे घडामोडी घडत असतानाच लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला आणि भाजपचे वारे जोरदारपणे वाहू लागले. या पक्षाचे अक्कलकोटचे आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्यासह राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे आदींना भाजप जवळचा वाटू लागला. सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीच्या प्रक्रियेत आमदार म्हेत्रे यांना भाजपशी आणखी जवळीक साधण्याची आयतीच संधी मिळाली. दिलीप माने यांनी सभापतिपद ज्यांच्यासाठी सोडले होते, त्या बाळासाहेब शेळके यांना संधी देण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षश्रेष्ठींची होती. परंतु घडले भलतेच. बहुमत काँग्रेस व राष्ट्रवादीकडे असताना भाजपचे नेते, पालकमंत्री विजय देशमुख यांना सभापती करण्यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये जणू अहमहमिका लागली. विशेषत: लिंगायत समाजासाठी ही बाजार समिती मानबिंदूचे प्रतीक असल्यामुळे या समाजाच्या ताब्यात पुन्हा सत्ता परत मिळण्यासाठी विजय देशमुख यांच्या पाठीशी ताकद उभी केली. खरे तर देशमुख यांनीही केवळ सहा महिन्यांसाठी सभापतिपदावर इच्छा प्रकट केली असताना काँग्रेसवाल्यांनी सहा महिने कशाला एक वर्षांचा कालावधी पूर्ण करावा, असा आग्रह पुढे केला.  बहुसंख्य संचालकांना एकदाचे ‘खूश’ करण्यात आल्यानंतर काँग्रेसच्या ताब्यातून सत्ता निसटली. या घडामोडींचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकांवर होणार आहे.

First Published on June 13, 2019 12:49 am

Web Title: congress party in solapur 2
Just Now!
X