|| अशोक तुपे

जिल्हाध्यक्षपदासाठी सुधीर तांबे यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींची सहमती नाही

सत्तेच्या केंद्रीकरणास पक्षश्रेष्ठी अनुकूल नसल्यामुळे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सुधीर तांबे यांच्या नावास संमती मिळू शकलेली नाही. त्यामुळे आता काँग्रेसच्या नगर जिल्हाध्यक्ष पदासाठी निष्ठावंतांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीत गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांचे समर्थक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांचा प्रचार केला. त्यामुळे पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी नवीन जिल्हाध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार जयंत ससाणे यांचे चिरंजीव करण ससाणे यांना नेमण्यात आले. विखे यांची साथ सोडून ससाणे हे थोरात यांना येऊन मिळाले. मात्र विखे यांच्या दबावाखाली ससाणे यांनी अवघ्या एकवीस दिवसांत जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संगमनेर येथील सभेच्या आदल्या दिवशी ससाणे यांनी राजीनामा दिला. विखे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे थोरात हे सावध झाले. त्यामुळे जिल्हाध्यक्ष पदासाठी त्यांनी आमदार सुधीर तांबे यांचे नाव पक्षश्रेष्ठींना सुचविले.

जिल्हाध्यक्ष पदाकरिता आमदार तांबे यांचे एकमेव नाव पक्षश्रेष्ठींकडे गेले.  मात्र पक्षश्रेष्ठींकडे तांबे यांचे नाव गेल्यानंतर त्यांनी अनुकूलता दर्शविली नाही. एकाच कुटुंबात अनेक पदे गेल्याने सत्तेचे केंद्रीकरण होते. त्याचा संदेश लोकांमध्ये योग्य जात नाही, अशी भूमिका मल्लिकार्जुन खर्गे व सरचिटणीस वेणुगोपाल यांनी घेतली.

थोरात हे काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीवर ते कायम निमंत्रित सदस्य आहेत. त्यांचे भाचे सत्यजित तांबे हे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, तर सुधीर तांबे हे आमदार असून त्यांच्या पत्नी दुर्गा तांबे या संगमनेरच्या नगराध्यक्षा आहेत. तांबे यांना जिल्हाध्यक्ष केले तर एकाच कुटुंबात सत्तेचे केंद्रीकरण झाल्याचा संदेश लोकांमध्ये जाईल, असे मत पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केले. त्यामुळे त्यांना जिल्हाध्यक्ष न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी पक्षाचा जिल्हाध्यक्ष पदासाठी नाव सुचविण्याची जबाबदारी थोरात यांच्यावरच टाकण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्ष पदाकरिता माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या स्नुषा अनुराधा नागवडे यांच्या नावाचा विचार करण्यात आला. थोरात यांनी नागवडे यांच्याशी चर्चा केली. मात्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी नागवडे या उत्सुक आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी त्यांची चर्चा झाली आहे. नागवडे यांनी पवार जो निर्णय देतील तो मान्य करण्याचे जाहीर केले. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी त्यांची नेमणूक केली व त्यांनी अचानक राष्ट्रवादीत प्रवेश केला तर पुन्हा पक्षाची अडचण होईल. विधानसभेच्या निवडणुकीत नगरच्या राजकारणात अचानकपणे फेरबदल होऊ  शकतात. त्यामुळे जिल्हाध्यक्ष नेमताना विशेष दक्षता घेण्यात आली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या मुलांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी दबावतंत्र आणले, अशी टीका केली होती. त्याची गंभीर दखल आता पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. यापुढे पक्षात नेत्यांच्या कुटुंबीयांना महत्त्वाची पदे देण्यात येणार नाहीत, असे संकेत तांबे यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या श्रेष्ठींच्या नकारामुळे स्पष्ट झाले आहेत.

नगर जिल्ह्य़ात काँग्रेसचे तीन आमदार होते. आता विखे यांच्या पक्षांतरामुळे काँग्रेसची स्थिती बिकट झाली आहे. विखे हे भारतीय जनता पक्षात गेल्याने एक आमदार कमी झाला आहे. लोकसभा निवडणुकीत थोरात यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांना मताधिक्य मिळू शकले नाही. तसेच आमदार कांबळे यांच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात १८ हजार मते त्यांना कमी मिळाली. ही सर्व राजकीय परिस्थिती काँग्रेससाठी अडचणीची आहे. त्यामुळे आता थोरात यांच्यापुढे मोठे राजकीय आव्हान उभे ठाकले आहे. त्यांना किमान तीन आमदार निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे.

जिल्ह्य़ात काँग्रेसपुढे आव्हान

नगर जिल्ह्य़ात काँग्रेसचे तीन आमदार होते. आता विखे यांच्या पक्षांतरामुळे काँग्रेसची स्थिती बिकट झाली आहे. विखे हे भारतीय जनता पक्षात गेल्याने एक आमदार कमी झाला आहे. लोकसभा निवडणुकीत थोरात यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांना मताधिक्य मिळू शकले नाही. तसेच आमदार कांबळे यांच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात १८ हजार मते त्यांना कमी मिळाली. ही सर्व राजकीय परिस्थिती काँग्रेससाठी अडचणीची आहे. त्यामुळे आता थोरात यांच्यापुढे मोठे राजकीय आव्हान उभे ठाकले आहे. त्यांना किमान तीन आमदार निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे.