अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये दाखल

नारायण राणे यांचे एकेकाळचे समर्थक, नंतर भाजपमध्ये गेलेले काका कुडाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कुडाळकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून भाजप व राणे यांना धक्का देण्याची काँग्रेसने तयारी केली आहे.

भाजप हे बुडते जहाज असून आगामी काळात त्या पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते काँग्रेमध्ये प्रवेश करतील, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. गांधी भवनमध्ये काका कुडाळकर यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी माजी मंत्री नसिम खान, आमदार हुस्नबानो खलिपे, माजी आमदार सुभाष चव्हाण, राजन भोसले, प्रवक्ते सचिन सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील त्यांचे कट्टर समर्थक काका कुडाळकर यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले. सध्या ते जिल्हा भाजपचे प्रवक्ते होते. काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या कुडाळकर यांना कुडाळ मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे. एकाच वेळी राणे व भाजपला धक्का देण्याची काँग्रेसची खेळी राहणार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान शिवसेनेचे सुभाष मयेकर यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला

देशातील महत्त्वाच्या दहा तपास यंत्रणांना कोणत्याही कॉल आणि इंटरनेट डेटावर नजर ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे. हा नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्यांवर गदा आणण्याचा प्रकार आहे, अशी टीका प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केली.

..सोहराबुद्दीन अस्तित्वात होते का?

सोहराबुद्दीन चकमक प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २२ जणांची निर्दोष मुक्तता केली. त्यावर, या निर्णयामुळे  सोहराबुद्दीन नावाची व्यक्ती या जगात अस्तित्वात होती का, जर ती व्यक्ती अस्तित्वात होती तर त्या व्यक्तीने स्वत:च स्वत:चा खून करून घेतला असावा, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी व्यक्त केली.

काँग्रेस महाआघाडीवर दिल्लीत लवकरच शिक्कामोर्तब

राष्ट्रवादी काँग्रेसह समविचारी पक्षांबरोबर महाआघाडीची चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे, आता पुढील चर्चा आणि शिक्कामोर्तब दिल्लीत होईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या विरोधात समविचारी आणि धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांची महाआघाडी बांधण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. त्यासाठी सहा महिन्यांपासून राष्ट्रवादी, भारिप बहुजन महासंघ, समाजवादी पक्ष, माकप, भाकप, शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, इत्यादी नऊ-दहा पक्षांच्या नेत्यांशी काँग्रेस वाटाघाटी करीत आहे.

काँग्रेसचा मुख्य आणि मोठा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर दोन-चार मतदारसंघांचा अपवाद वगळता ४० जागांच्या वाटपावर मतैक्य झाले आहे. दोन्ही काँग्रेस नेत्यांची गुरुवारी पुन्हा रात्री बैठक झाली. त्यानंतर शुक्रवारी दुपारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्याशी अशोक चव्हाण आणि अन्य नेत्यांनी चर्चा केली. काही महिन्यांतील चर्चेनंतर महाआघाडीबाबतचा अंतिम प्रस्ताव तयार झाला आहे.

त्यावर अखिल भारतीय काँग्रेसची अंतिम मोहोर उमटवली जाईल. त्या आधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राज्याचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करून आघाडीला अंतिम स्वरुप देतील, असे चव्हाण यांनी सांगितले.

आंबेडकरांशी सकारात्मक चर्चा

काँग्रेसबरोबर युती केली तरी, एमआयएमची साथ सोडणार नाही, असे भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे, याकडे चव्हाण यांचे लक्ष वेधले असता, एमआयएमचा आणि आमचा काहीही संबंध नाही, परंतु महाआघाडीबाबत आंबेडकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.