कार्यकर्ते विसरत असलेला पक्षाचा इतिहास, भाजपच्या राज्य आणि केंद्रातील प्रमुख नेत्यांच्या विधानातील विसंगती आणि आश्वासनांचा विसर, काँग्रेसच्या पराभवाबद्दल आत्मपरीक्षण तसेच प्रचारतंत्रात समाजमाध्यमांचे (सोशल मीडिया) महत्त्व याचा विचार करीत जालना येथे पार पडलेल्या काँग्रेसच्या शिबिरात प्रचारतंत्राचे मुख्य केंद्र समाजमाध्यमे असतील, अशी रचना असल्याचे दिसून आले.

शिबिरात समाजमाध्यमे कशी हाताळावी आणि पक्षपातळीवर ती कशी हाताळली जातील, याचे विवेचन करताना अभिजीत सपकाळ म्हणाले की, सध्या देशातील २० कोटी जनता सोशल मीडियावर असून २०१९ मध्ये त्यामध्ये २५ टक्के वाढ होईल. गुजरातच्या गेल्या विधानसभा निवडणुकीत साडेअकरा टक्केमते काँग्रेसच्या बाजूने ‘स्विंग’ झाली आणि यामध्ये सोशल मीडियाची मोठी भूमिका होती. सोशल मीडियाचा आपली मते जनतेवर लादण्यासाठी भाजपची मंडळी कसा उपयोग करतात याची उदाहरणे देऊन यापुढे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ई-मेल, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी माध्यमांचा उपयोग करण्याची आवश्यकता आहे. विशेषत: मतदान केंद्रनिहाय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. अण्णा हजारे यांचे जनलोकपाल आंदोलन, रामदेवबाबा, लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजप नेत्यांनी दिलेली आश्वासने, महागाई, मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची वक्तव्ये इत्यादी संदर्भातील ध्वनिचित्रफितींचा समावेश असलेले सादरीकरण काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर करण्यात आले. त्यातून निवडणुकीच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी समाजमाध्यमे असतील, असा संदेश स्पष्टपणे दिला जात होता. काँग्रेसच्या व्यासपीठावरून बोलताना भालचंद्र मुणगेकर म्हणाले,  काँग्रेसचा मुलाधार मुस्लीम, दलित, ओबीसी, भटके-विमुक्त, आदिवासी असा आहे, त्याचा विसर पडता कामा नये. काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नसून ती लोकचळवळ असल्याचे सांगून मुणगेकर म्हणाले, जवाहरलाल नेहरू दहा वर्षे देशासाठी तुरुंगात होते. ते काही इतरांसारखे तुरुंगातून पळाले नव्हते. राजीव गांधी यांच्यामुळे तंत्रज्ञानात झालेली क्रांती, घटनादुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना मिळालेले आरक्षण इत्यादी बाबींवरही त्यांनी प्रकाश टाकला. काँग्रेसने निर्माण केलेला सामाजिक विचार संपविण्याचे काम भाजप करीत असल्याचा आरोप मुणगेकर यांनी केला.

प्रा. वसंत पुरके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप करतानाच राष्ट्रवादीवरही टीका केली. राष्ट्रवादीला कोणतेच बूड नाही, पण ते सत्तेत आल्याशिवाय राहत नाहीत. या पक्षाच्या नेत्याने धरणात लघुशंका करण्याच्या संदर्भात वक्तव्य केले आणि निवडणुकीत त्याचा मार काँग्रेसलाही खावा लागला, असे पुरके म्हणाले. प्रशिक्षण शिबिराऐवजी जाहीर सभेत बोलावे, असे त्यांचे भाषण उपस्थित कार्यकर्त्यांनी इतर वक्त्यांच्या तुलनेत सर्वाधिक डोक्यावर घेतले. एकपात्री अभियानाच्या अंगाने गेल्यासारख्या या भाषणात भाजप नेत्यांवर टीका होती आणि काँग्रेसला अप्रत्यक्षरीत्या आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही होता.

आगामी निवडणुकीत आघाडी करण्याच्या संदर्भात राष्ट्रवादींच्या नेत्यांसोबत मुंबईत चर्चा झाली, परंतु अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे या प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव कमी झाल्याने आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. शिवसेना हा काही आमचा मित्रपक्ष नाही. परंतु भाजप मात्र क्रमांक एकचा शत्रुपक्ष आहे, असे चव्हाण यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले. मोहन प्रकाश, शरद रणपिसे, हरीश रोग्ये यांच्यासह अन्य नेत्यांची भाषणे यावेळी झाली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार हुसेन दलवाई, नाना पटोले, खासदार राजीव सातव यांची उपस्थिती शिबिरात होती.

जालना जिल्ह्य़ातील चारपैकी तीन नगर परिषदांची अध्यक्षपदे काँग्रेसकडे आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन जागा काँग्रेसने अल्प मतांनी हरल्या आहेत. विधानसभेसह जालना लोकसभेची जागा काँग्रेसकडे यावी यासाठी आमचे प्रयत्न आहे. जिल्ह्य़ातील काँग्रेस विचारांच्या मतांचे एकत्रीकरण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पक्षाने जालना जिल्हा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर घेतले, त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.      – सुरेश जेथलिया, अध्यक्ष, जालना जिल्हा काँग्रेस