20 October 2020

News Flash

भाजपच्या आयात उमेदवारांमुळे काँग्रेसला आव्हान

जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून सत्ता असलेल्या काँग्रेसला लातूरचा गड कायम राखण्याकरिता यंदा प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. भाजपने कडवे आव्हान उभे केले असून, नगरपालिका निवडणुकीतील यशाने

निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून प्रचार साहित्याच्या विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत.  

जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून सत्ता असलेल्या काँग्रेसला लातूरचा गड कायम राखण्याकरिता यंदा प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. भाजपने कडवे आव्हान उभे केले असून, नगरपालिका निवडणुकीतील यशाने भाजपचा आत्मविश्वास बळावला आहे.

जिल्हा परिषदेच्या ५८ गटांसाठी २३० तर १० पंचायत समितीतील ११६ गणांसाठी ४१९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप वगळता एकाही पक्षाने सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले नाहीत.

जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून काँग्रेसची सत्ता होती. मावळत्या सभागृहात ५८  सदस्यांपकी काँग्रेसचे ३५, राष्ट्रवादी (९), शिवसेना (५), भाजप (८) तर मनसेचा एक अशी सदस्य संख्या आहे. या निवडणुकीत सर्वच पक्षांनी नवे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरविले असून, विद्यमान केवळ १० सदस्यच निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातही काँग्रेसने केवळ तिघांनाच संधी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या पक्षातून आयात केलेल्या उमेदवारांना भाजपने संधी दिली आहे.

भाजपने कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेत सत्ता आणायची या उद्देशाने विविध पक्षांतील मंडळींना भाजपत सामील करून तब्बल नव्या ११ जणांना उमेदवारी देऊ केली आहे. काँग्रेसने पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी केली आहे. औसा विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरीत ठिकाणी ही आघाडी झाली आहे. ४९ जागांपकी ३९ जागा काँग्रेस तर १० जागा राष्ट्रवादी लढते आहे.

भाजपमध्ये बंडखोरी

शिवसेनेची या निवडणुकीत स्वबळाची घोषणा असली तरी शिवसेनेला सर्व जागांवर उमेदवार उभे करता आले नाहीत. भाजपने प्रचाराची आक्रमक मोहीम आखली. पक्षांतर्गत सर्व गटतटांना एकत्र करून निवडणूक जिंकण्याचे उद्दिष्ट सर्वाच्या समोर ठेवले असले तरी बंडखोरीला पायबंद घालण्यात भाजपला यश आले नाही. निष्ठावंतांनी आपल्याला पक्षाने डावलले असे सांगत बंडखोरी केली आहे. ही बंडखोरी कोणाच्या पथ्यावर पडते यावर भाजपचे भवितव्य अवलंबून आहे.

१२ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाच्यावतीने शिवराज पाटील चाकूरकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रचाराचा शुभारंभ झाला. आमदार दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, आमदार त्र्यंबक भिसे व आमदार बसवराज पाटील मुरूमकर हे प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने देशमुख कुटुंबीयांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर ही पहिलीच जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. ते असेपर्यंत अंतर्गत गटातटालाही त्यांनी कधी भीक घातली नाही. विरोधकांचा तर प्रश्नच नव्हता. आता परिस्थिती बदलली आहे. पक्षांतर्गत गट एकत्र करून विरोधकांचे आव्हान पेलण्यासाठी देशमुख कुटुंब कामाला लागले आहे. विलासराव देशमुखांचे कनिष्ठ सुपुत्र धीरज देशमुख यांच्या गळ्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ घालण्यासाठी देशमुख कुटुंबीयांनी सर्व आयुधे रणांगणात वापरण्याचे ठरवले आहे.

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर व त्यांचे सुपुत्र अशोक पाटील निलंगेकर हे या निवडणुकीत फारसे सक्रिय नाहीत. अहमदपूरचे अपक्ष आ. विनायक पाटील भाजपवासी झाल्यामुळे व उदगीरचे आ. चंद्रशेखर भोसले दिवंगत झाल्यामुळे काँग्रेस अडचणीत आहे. मात्र अडचणीवर मात करत विजय संपादन करण्याच्या दृष्टीने काँग्रेसने व्यूहरचना आखली आहे.

आरोप-प्रत्यारोप सुरू

राष्ट्रवादीची स्थिती बेतासबात आहे. मागील निवडणुकीइतक्या जागा जरी मिळाल्या तरी राष्ट्रवादी समाधानी राहणार आहे. शिवसेनेने आपल्या जागा कमी आल्या तरी चालतील मात्र भाजपच्या पायात पाय घालण्यासाठी व्यूहरचना आखली आहे.

ज्या ठिकाणी भाजपाचा बालेकिल्ला त्या ठिकाणीच भाजपला िखडीत गाठण्याचा प्रयत्न शिवसेनेने चालवला आहे. ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी दुरंगी होईल. पालकमंत्री संभाजी पाटील व देशमुख कुटुंबीय यांच्यात शब्दाच्या फैरी चांगल्याच झडत आहेत. आ. दिलीपराव देशमुख यांनी आमच्या घरातील लहान मुलेही लाल दिव्याशी खेळतात असे उपरोधिक विधान केल्यानंतर संभाजी पाटील निलंगेकर यांनी आता लहान मुलेच काय तुमच्या घरातील ज्येष्ठांनाही खेळण्यातील लाल दिव्याशीच खेळावे लागेल, कारण लाल दिवा हा वातानुकूलित गाडीत फिरणाऱ्याच्या हातात यापुढे राहणार नाही. तो सामान्य माणसाच्या हाती दिला जाणार असल्याचे विधान केल्यामुळे प्रचाराची धार वाढली आहे.

‘चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा परिषदेचा कारभारदेखील लातूर जिल्हा परिषदेपेक्षा चांगला आहे. राज्यातून लातूर जिल्हा परिषदेचा खालून चौथा क्रमांक असल्याचे विधान पालकमंत्री संभाजी पाटील यांनी केले तर पंतप्रधान मोदी यांनीच लातूर जिल्हा परिषदेच्या कामाचे कौतुक केल्यामुळे जिल्हा परिषदेवर टीका करण्याचा विरोधकांना अधिकार नसल्याचे देशमुखांचे म्हणणे आहे. आगामी आठवडाभर जिल्हाभर निवडणुकीच्या प्रचाराचा राळ उठतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 1:46 am

Web Title: congress party vs bjp in latur district
Next Stories
1 सुवर्णभोजनाच्या ताटानंतर आता काँग्रेसचा हवाई थाट!
2 वर्षभरात रस्ते अपघातात ३०१ जणांचा मृत्यू
3 सेनेची ताकद कमी झाल्यानेच हार्दिक पटेलची सोबत
Just Now!
X