काँग्रेसला बुलढाणा मतदारसंघ हवा

गेल्या अनेक वर्षांपासून भाजप व शिवसेना युतीच्या ताब्यात असलेल्या पश्चिम वऱ्हाडातील अकोला व बुलढाणा लोकसभा मतदारसंघांत काँग्रेस व राष्ट्रवादीने चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये अकोला व बुलढाणा मतदारसंघांत अदलाबदल करण्याच्या जोरदार हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याची माहिती आहे. काँग्रेस बुलढाणा, तर राष्ट्रवादी अकोला मतदारसंघात लढण्यासाठी इच्छुक असल्याने यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. हा बदल प्रत्यक्षात घडून आल्यास पश्चिम वऱ्हाडातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत बुलढाणा मतदारसंघ राष्ट्रवादीने, तर अकोला काँग्रेसने लढला. मात्र, दोन्ही ठिकाणी सातत्याने आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. २००४ पासून बुलढाणा शिवसेनेने, तर अकोला भाजपने मोठय़ा मताधिक्याने कायम राखला आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या दृष्टीने अनुकूल आहे. हा मतदारसंघ राखीव असताना काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी तीन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी गेल्यावर आघाडीमध्ये वाटाघाटीत राष्ट्रवादीकडे गेला. मात्र, राष्ट्रवादीला या मतदारसंघातून विजय प्राप्त करता आला नाही. हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस बुलढाणा मतदारसंघ स्वत:कडे घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव व बुलढाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. बुलढाण्यात काँग्रेसने तयारी सुरू केल्याचे चित्र असून, दुसरीकडे राष्ट्रवादीकडेही सक्षम उमेदवाराचा अभाव जाणवतो. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडे जाण्याची दाट शक्यता आहे.  अकोला मतदारसंघातही बदल घडून येण्याची चिन्हे आहेत. भारिप-बमसंच्या प्रभावामुळे अकोल्यात युती, आघाडी व भारिप-बमसं अशी तिहेरी लढत होते. याचा थेट फायदा भाजपला होत असल्याने सिद्ध झाले आहे. तीन वेळा खासदार संजय धोत्रे यांच्या रूपाने भाजपने निर्विवाद वर्चस्व गाजवले. काँग्रेस व भारिप-बमसंने एकत्र आल्याशिवाय अकोला मतदारसंघात भाजपला पराभूत करणे शक्य नसल्याचा इतिहास आहे. त्यामुळे काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांच्याकडे वारंवार ‘हात’ पुढे करण्यात येतो. मात्र, योग्य प्रस्ताव नसल्याचे कारण पुढे करून प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचा प्रस्ताव धुडकावला आहे. आता पुन्हा एकदा आंबेडकर यांना सोबत घेण्याचे प्रयत्न काँग्रेसने सुरू केले आहेत. त्यातच राष्ट्रवादी अकोला लोकसभा लढण्यासाठी चाचपणी करीत असल्याचे समोर आले आहे.

विदर्भात आघाडीकडून अस्तित्वाची धडपड

विदर्भातील लोकसभेच्या १० जागांपैकी भाजपच्या ताब्यात सहा, तर शिवसेनेकडे चार जागा आहेत. २०१४ च्या निवडणुकीत आघाडीचा सुपडा साफ झाला होता. त्यामुळे विदर्भात अस्तित्व निर्माण करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीकडून धडपड सुरू झाली आहे. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांचे दौरेही वाढले आहेत.

राष्ट्रवादी गटातटांत विभागलेली

सध्या अकोला जिल्ह्य़ात राष्ट्रवादी गटातटात विभागली आहे. पक्षात नेते जास्त आणि कार्यकर्ते कमी अशी स्थिती आहे. एकमेकांचे पाय ओढण्याचे राजकारण करण्यातच नेते धन्यता मानतात. खा. सुप्रिया सुळे यांच्या आढावा दौरात पक्षातील गटबाजी उफाळून येण्यासोबतच पदाधिकारी व नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झाडल्या होत्या. खा. सुळे यांच्यासमोरच राजीनामा नाटय़ही रंगले होते.

राजकारणात सध्या संक्रमण अवस्था आहे. विविध मुद्दय़ांनी देशातील वातावरण ढवळून निघत आहे. लोकसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडी किंवा जागावाटपाचा निर्णय झाला नाही. अंतिम क्षणी कोणताही निर्णय होऊ  शकतो. पक्षादेश अंतिम राहील.   – आ. हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रीय सचिव, काँग्रेस

पश्चिम वऱ्हाडात राष्ट्रवादीचे पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणुकांच्या दृष्टीने चाचपणी करण्यात येत आहे. अकोला लोकसभा राष्ट्रवादीकडून लढण्याच्या दृष्टीने काही नेते संपर्कात आहेत. या संदर्भातील अंतिम निर्णय पक्षनेतृत्व लवकरच घेईल.  – रामेश्वर पवळ, प्रदेश संघटक, राष्ट्रवादी