News Flash

रायगडमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सलोख्यात ‘शेकाप’चा अडसर

रायगड जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसची शेकापशी असलेली सलगी दोन्ही पक्षांच्या आघाडीसाठी मारक ठरू शकते.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

नागपुरातील हल्लाबोल मोर्चामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सलोख्याचे संबंध प्रस्तापित झाल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याचा चर्चा सुरू झाल्या. पण रायगड जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसची शेकापशी असलेली सलगी दोन्ही पक्षांच्या आघाडीसाठी मारक ठरू शकते.

गेल्या वर्षी झालेल्या रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र यावे यासाठी प्रदेश पातळीवरून अनेक प्रयत्न केले गेले. मात्र निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीनी शेकापशी केलेली आघाडी यात मोठा अडसर ठरली. शेकाप हा काँग्रेसचा पारंपरिक विरोधी पक्ष मानला जातो. अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघात दोन्ही पक्षात नेहमी टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो. यात शेकाप अनेकदा वरचढ ठरतो. याचे शल्य काँग्रेसमधील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नेहमीच असते. दोन्ही पक्षातील वाद कधी कधी टोकाला जातात आणि कार्यकत्रे एकमेकांना भिडतात.

अशा विपरीत परिस्थितीत जर प्रदेश काँग्रेस कमिटीने शेकाप आणि राष्ट्रवादी यांच्याशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला तर तो स्थानिक पातळीवरील कार्यकत्रे आणि नेते कदापी मान्य करणार नाहीत. गेल्या वर्षीच्या जिल्हा परिषद निवडणुकीत नेमके हेच चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्य़ात शिवसेनेचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी काँग्रेसने शेकाप राष्ट्रवादी आघाडीसोबत यावे यासाठी शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बरेच प्रयत्न केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या आघाडीला अनुकूलता व्यक्त केली. मात्र अलिबाग तालुक्यातून माजी आमदार मधुकर ठाकूर आणि पेणमधून माजी मंत्री तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रवीशेठ पाटील यांनी या आघाडीला ठाम विरोध केला. या उलट त्यांनी शिवसेना भाजप यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रस्ताव प्रदेश कमिटीसमोर ठेवला. दोघेही आपआपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने प्रदेश कमिटीने आघाडीबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे धोरण स्वीकारले.

जिल्हा परिषद निवडणुकीत उत्तर रायगडात काँग्रेस शिवसेना, भाजप बरोबर तर दक्षिण रायगड मधील काँग्रेस शेकाप राष्ट्रवादी बरोबर उभी ठाकल्याचे पाहायला मिळाले. सोयीस्कर आघाडीची मोठी किंमत पक्षाला चुकवावी लागली. जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला. पेण आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघात पक्षाला प्रस्थापित मतदारसंघ गमवावे लागले. पण दुसऱ्या बाजूला शेकापचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अलिबागमध्ये काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेच्या जागा निवडून आल्या. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत पेणमध्ये उलटे चित्र पाहायला मिळाले, काँग्रेस शिवसेना आघाडीला मतदारसंघात चांगले यश मिळाले.

जिल्ह्य़ातील काँग्रेस कमिटीत दोन उभे गट पडल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. दक्षिण रायगडातील काँग्रेस शेकाप आणि राष्ट्रवादीच्या बाजूने तर उत्तर रायगडातील काँग्रेस शेकाप राष्ट्रवादी विरोधात कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात पक्षासाठी ही मोठी अडचण ठरणार आहे.

माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या निधनानंतर रायगड जिल्ह्य़ात काँग्रेसची वाताहत सुरू झाली आहे. पक्षाला एकसंध बांधून ठेवेल आणि दिशा देईल असे नेतृत्वच उरलेल नाही. त्यामुळे वादळात भरकटलेल्या जहाजासारखी गत पक्षाची झाली आहे. याचा आधी विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत प्रत्यय आला आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर पक्षाला याची मोठी किंमत चुकवावी लागण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रविशेठ पाटील यांनी संघटनेपासून अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले आहे. ते पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. काही दिवसांपूर्वीच महाड येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने जनआक्रोश सभेच आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कोकणातून यासाठी कार्यकत्रे महाड मध्ये दाखल झाले होते. मात्र पाटील यांनी या सभेस जाणे टाळले. किंबहुना प्रदेश उपाध्यक्ष असूनही त्यांना जनआक्रोश मेळाव्याच्या नियोजनात सहभागी करून घेतले नाही. यानंतर मुंबई गोवा महामार्गाच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने नुकतेच पनवेल, वडखळ, महाड येथे आंदोलने करण्यात आली. यातदेखील पेणमधील कार्यकत्रे आणि नेते सहभागी झालेले नाहीत.

पारंपरिक विरोधक..

काँग्रेसने राष्ट्रवादी आणि शेकापशी केलेली सलगी या नाराजीचे मूळ कारण आहे. उत्तर रायगडात शेकाप आणि काँग्रेस हे पारंपरिक विरोधक आहेत. पक्षश्रेष्ठीकडून शेकाप आणि राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याच्या सूचना कार्यकत्रे आणि नेत्यांसाठी अडचणीच्या ठरत आहेत. तीन पक्षांची आघाडी झाल्यास काँग्रेस कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होईल अशी धास्ती त्यांना वाटते आहे. दक्षिण रायगडात काँग्रेससमोर शिवसेनेचे आव्हान आहे. तिथे शेकापची फारशी ताकदही नाही. त्यामुळे दक्षिण रायगडात काँग्रेसला शेकापशी जुळवून घेण्यात काहीच अडचण येताना दिसत नाही. त्यामुळे राज्यपातळीवर जरी काँग्रेस राष्ट्रवादीचे सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले तरी रायगडात जोवर राष्ट्रवादी-शेकापची सलगी जोवर संपणार नाही तोवर दोन्ही पक्षांचे सूत जुळण्याची शक्यता दिसून येत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 1:30 am

Web Title: congress party vs ncp in raigad district
Next Stories
1 कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा प्रारंभ २४ डिसेंबरपासून
2 सरकारविरोधात पुन्हा घोषणाबाजी, शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक
3 ‘जलयुक्त’च्या तक्रारी जलसंधारण आयुक्तालयाच्या खुंटीला!
Just Now!
X