शहराच्या केडगाव उपनगरात, महापालिकेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे विशाल कोतकर यांनी शिवसेनेचे विजय पठारे यांचा ४५४ मतांनी पराभव केला आहे. भाजपचे उमेदवार महेश सोले यांची अनामत रक्कम जप्त झाली. या निकालाने केडगाव उपनगरावर कोतकर गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. निकाल जाहीर होताच कोतकर समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला.

काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे नगरकरांना निकालाची उत्सुकता होती. माजी महापौर संदीप कोतकर याला जन्मठेपेची शिक्षा लागल्याने त्याचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले, त्या प्रभाग ३२ ब या खुल्या प्रवर्गातील जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. काल, शुक्रवारी मतदान झाल्यानंतर आज, शनिवारी सकाळी जुन्या महापालिकेच्या कार्यालयात प्रांताअधिकारी स्वाती सूर्यवंशी आणि तहसीलदार सुधीर पाटील यांच्या मार्गदशर्नाखाली मतमोजणी झाली. त्यासाठी सुमारे २५ कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

पहिल्या फेरीत शिवसेनेच्या विजय पठारे यांनी १७४ मतांची आघाडी घेत १ हजार ३३६ मते घेतली. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाला होता. त्यावेळी काँग्रेसचे विशाल कोतकर यांना १ हजार १६२ मते मिळाली होती. भाजपचे महेश सोले यांना केवळ ८४ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत मात्र पठारे मागे पडले ते कायमचेच. विशाल कोतकर यांची ही आघाडी ६२८ मतांची होती. भाजपचे महेश सोले यांना दुसऱ्या फेरीतही दोन अंकी म्हणजेच, ७२ मते मिळाली. महेश सोले यांना एकूण १५६ मते मिळाली. विशाल आणि विजय यांच्याजवळ देखील त्यांना पोहचता आले नाही. दुसऱ्या फेरीत नोटाचे बटण ५० जणांनी दाबले. पहिल्या फेरीत मात्र नोटा बटण मतदारांनी दाबलेच नव्हते.

विशाल कोतकर यांचा विजय निश्चित झाल्यावर कार्यकर्त्यांनी गर्दी करत जल्लोष केला. गुलालाची उधळण केली. संदीप कोतकर याच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. नंतर केडगावपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.