लोकसभा निवडणुकीची अद्याप घोषणा झाली नसली तर देशभरात राजकीय पक्षांच्या हालचालींमध्ये वाढ झाली आहे. युती-आघाडीच्या राजकारणासही सुरूवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे आगामी लोकसभा निवडणूक प्रचाराची सुरूवात महाराष्ट्रातील धुळे येथून करण्याची शक्यता आहे. येत्या १ मार्चला राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे धुळे येथे आयोजन करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. धुळ्यातील सभेत काँग्रेस मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर काँग्रेसकडून पुढील महिन्यात महाराष्ट्रात प्रियंका गांधी यांच्या रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे.

त्यानंतर येत्या २० मार्च रोजी नांदेड येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त प्रचारसभा होईल. या रॅलीत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, अशोक चव्हाण, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे हेही सहभागी होणार आहेत.

एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. राहुल गांधी हे धुळ्यात प्रचाराची सुरूवात करतील. प्रचार हंगामातील त्यांची ही पहिली सभा असेल, असे सूत्राकडून समजते.

पक्ष कार्यकर्त्यांसाठी धुळे हे सोयीचे असून इथे जळगाव, नंदूरबार या शेजारील जिल्ह्यातूनही कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होऊ शकतात, असे या कार्यकर्त्याने सांगितले. राहुल गांधी यांना राज्यातील वरिष्ठ कार्यकर्त्यांनी ४ ते ५ सभा घेण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी धुळ्यात राहुल गांधी यांच्या सभेसाठी नियोजन सुरू असून अद्याप याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचे त्यांनी म्हटले.