राज्यात १५ दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला असून बुधवारी रात्री ८ वाजेपासून या लॉकडाउनला सुरुवात झाली. यामध्ये करोनाला आवर घालण्यासाठी १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारकडून लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनवर विरोधकांनी टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या टाळेबंदी पॅकेजवर टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांच्या तोकडेपणा आणि दळभद्रीपणा समोर आला आहे. आपण सरकार सोबतच आहोत असं फक्त म्हणून अंमलात आणलेल्या निर्णयावर भाजपा राजकारण करत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते कराडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला लॉकडाऊन!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधत महाराष्ट्रात लॉकडाउनची घोषणा केली. यामध्ये १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जीवनावश्यक सेवा वगळता इतरांना प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सबळ कारणाशिवाय प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यासोबतच, लॉकडाउनमुळे ज्यांच्या पोटावर पाय येण्याची शक्यता आहे, अशा वर्गासाठी आर्थिक सहाय्य करणाऱ्या घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

समजून घ्या : महाराष्ट्रात लॉकडाऊनचे नेमके काय आहेत नियम? काय सुरू आणि काय असेल बंद?

विरोधी पक्षनेत्यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

दरम्यान, लॉकडाउनच्या निर्णयावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी तोंडसुख घेतलं आहे. “लॉकडाउनमध्ये घोषणा केलेल्या योजना म्हणजे निव्वळ धूळफेक आहे”, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याशिवाय, “मुख्यमंत्र्यांनी जनतेची बोळवण केली आहे”, अशा शब्दांत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

मोदी सरकारवरही साधला निशाणा

दरम्यान, यावरून आता पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतलं आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदीचा निर्णय क्रांतीकारक असा घेतला आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. सामान्य जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पण सरकारच्या या निर्णयावरती भाजपा नेते टीका करत असल्याने त्यांचा तोकडेपणा आणि दळभद्रीपणा समोर आला आहे”, असं चव्हाण म्हणाले आहेत. “राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना, राज्याची तिजोरी मोकळी असताना सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. मोदी सरकारने मागील टाळेबंदीमध्ये फक्त धान्य वाटपाच्या रूपाने तुटपुंजी मदत केली होती”, असं देखील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress prithviraj chavan on bjp criticism cm uddhav thackeray lockdown in maharashtra pmw
First published on: 14-04-2021 at 20:50 IST