पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर साक्षात लोटांगण घातलं असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. “हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन हे औषध निर्यात न करण्याचा निर्णय हा आधीच घेतलेला असणार. परंतू अमेरिकेला या औषधाची गरज भासली आणि त्यांनी नरेंद्र मोदींना दम दिला की, औषध द्या नाहीतर त्याचे परिणाम भोगायला तयार रहा. आता खरं तर त्या दोघांना हे फोनवर गुपचूप हे करता आलं असतं, परंतु आपण किती शक्तिशाली आहोत हे दाखवण्यासाठी ट्रम्पनी ते जाहीरपणे केलं आणि मोदींनी मग त्यांच्यासमोर साक्षात लोटांगण घातलं,” असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चव्हाण म्हणाले की, “मलेरियासाठी असलेल्या औषधाच्या निर्यातीला आपल्याकडे बंदी होती, परंतु अमेरिकेला या औषधाची गरज करोनामुळे लागली आणि ट्रम्प व मोदी यांच्यात संवाद झाला. मात्र हा संवाद फक्त दोघांमध्ये न होता, जाहीर झाला आणि ट्रम्प यांनी मोदींना दम दिल्याचे व मोदींनी ट्रम्प यांच्यासमोर लोटांगण घातल्याचे दिसून आले”.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे मदत मागत धमकीवजा इशाराही दिला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करण्याची मागणी करताना मदत न केल्यास परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं की, “मी रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. तुम्ही आम्हाला हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करत आहात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत असं सांगितलं आहे. पण जर त्यांनी पुरवठा केला नसता, तरी काही हरकत नव्हती. पण मग आम्हीही जशास तसं उत्तर दिलं असतं, आणि ते आम्ही का करु नये ?”.

यानंतर भारताकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाच्या निर्यातीवरील निर्बंध हटवण्यात आले. भारताने अमेरिकेच्या मागणीनुसार मलेरियावर उपयुक्त असणारे हायड्रोक्सीक्लोरोक्विन औषधांचा साठा अमेरिकेला पाठवल्यानंतर ट्रम्प यांना करोनाविरुद्धच्या मानवतेच्या लढाईत भारताने केलेल्या सहकार्याबद्दल भारताचे आभार मानले.