पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती बघता काँग्रेसच्यावतीनं सोमवार २९ जून रोजी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी १० ते १२ या वेळेत दोन तासांचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

“गेल्या १८ ते २० दिवसांपासून डिझेल आणि पेट्रोलच्या दरवाढीचा जीवघेणा खेळ केंद्र सरकार देशातील सर्वसामान्यांसोबत खेळत आहे. जेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात घसरले तेव्हा त्यांना २ ते ३ महिन्यात तेलाचे दर कमी करता आले नाही. कच्च्या तेलात दरवाढ होताच पेट्रोल ८.५० डिझेल १०.४९ रूपयांनी महाग करून नरेंद्र मोदी सरकार देशवासियांना चटके देत आहेत,” असा आरोप यावेळी धानोरकर यांनी केला.

पेट्रोल-डिझेल आता ऐंशी नंतर नव्वद पूर्ण करन शंभर रुपये करुन देशवासियांवर सूड उगवण्याचा केंद्राचा उद्देश आहे. करोनाच्या टाळेबंदीने संपूर्ण देश त्रासलेला असताना पेट्रोल व डिझेल किंमत अस्मानाला भिडल्या आहेत. त्यात चीनच्या भ्याड हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले. केंद्र सरकार सीमांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरली आहे, असाही आरोप खासदार धानोरकर यांनी केला. दरम्यान, आज चंद्रपूर जिल्हा व शहर काँग्रेस समितीच्यावतीने शहीदोंको सलाम दिवस पाळण्यात आला.

दारूबंदी मागे घेण्याबाबत पालकमंत्र्यांसोबत – धानोरकर

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी करोना संपताच सप्टेंबर किंवा ऑक्टोंबरमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी मागे घेवू असे जाहीर केले आहे. पालकमंत्र्यांच्या या निर्णयाला समर्थन असल्याचेही खासदार धानोरकर यावेळी म्हणाले.