रेल्वे दरवाढीच्या विरोधात जिल्हा काँग्रेसतर्फे परभणी रेल्वेस्थानकावर सचखंड एक्सप्रेस अर्धा तास अडवून आंदोलन करण्यात आले.
प्रदेश काँग्रेसने रेल्वे दरवाढीविरोधात राज्यभर आंदोलनाची हाक दिली होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी कार्यकर्त्यांंसह रेल्वेस्थानकावर धडक मारली. सकाळी साडेदहाच्या सुमारास नांदेडहून अमृतसरकडे जाणारी सचखंड एक्सप्रेस स्थानकात आल्यानंतर अडविण्यात आली. आंदोलनात भगवानराव वाघमारे, इरफान नुर रहेमान, बाळासाहेब देशमुख, गफार मास्टर, नदीम इनामदार, रवी पंतगे, नागेश सोनपसारे, रविराज देशमुख, जलालोद्दीन काझी आदी सहभागी झाले होते. आंदोलनामुळे प्रवाशांचा अर्धा तास खोळंबा झाला.
उस्मानाबाद शहरात काँग्रेसचे रेल रोको
वार्ताहर उस्मानाबाद
केंद्र सरकारने प्रवासी भाडय़ासह मालवाहतूक भाडय़ात भरमसाठ दरवाढ केल्याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेसच्या वतीने बुधवारी उस्मानाबादेत रेल रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती.
‘अच्छे दिन आयेंगे’ म्हणून मोठी प्रसिद्धी केलेल्या मोदी सरकारने मतदारांना फसविल्याचा आरोप जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे. मोदी सरकारच्या रेल्वे प्रवासी व मालवाहतूक दरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने सकाळी सव्वाअकरा वाजता रेल रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जि. प. अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास िशदे, राजेंद्र शेरखाने, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे व कार्यकत्रे सहभागी झाले होते. आंदोलनामुळे लातूर व मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे अडकून पडल्या होत्या. प्रवाशांचेही हाल झाले.
युवक काँगेसकडून रेल्वे दरवाढीचा निषेध
वार्ताहर, िहगोली
केंद्र सरकारने रेल्वे प्रवासी भाडय़ात १४.२ टक्के व मालवाहतूक भाडय़ात ६ टक्के केलेल्या दरवाढीचा युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. युवक काँग्रेसचे शेख अजीज शेख बुऱ्हाण व कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले. ही दरवाढ अन्यायकारक व दुर्दैवी असून तत्काळ मागे घ्या, अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर नीलेश पाटील, मयूर राठोड, स्वप्नील इंगळे, अशोक पोले आदींच्या सह्य़ा आहेत.
काँग्रेसचे नांदेडातील आंदोलन अवघ्या १५ मिनिटांत गुंडाळले
वार्ताहर, नांदेड
रेल्वे दरवाढीच्या निषेधार्थ मोठा गाजावाजा करून नांदेडात काँग्रेसने आंदोलन केले खरे; पण अवघ्या १५ मिनिटांत ते गुंडाळण्यात आले. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण नांदेडात असूनही आंदोलनाकडे फिरकले नाहीत.
दोन दिवसांपूर्वी रेल्वे दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. खासदार चव्हाण बुधवारी नांदेडात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आंदोलन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होईल, असेही काँग्रेसने जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात चव्हाण आंदोलनाकडे फिरकलेच नाहीत. सकाळी साडेनऊ वाजता जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जि. प. अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, शहराध्यक्ष अनिता इंगोले यांच्या नेतृत्वाखाली तपोवन एक्सप्रेस १५ मिनिटे अडवून धरण्यात आली. अवघ्या १५ मिनिटांत ‘फोटो सेशन’ झाले आणि आंदोलन गुंडाळण्यात आले.
‘अब की बार, मोदी सरकारकी लूटमार’, ‘मोदीजी के अच्छे दिन जनता के बुरे दिन’, ‘काँग्रेस पक्षाचा विजय असो’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानक परिसर दणाणून सोडला. आंदोलनात काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
पंधरा वर्षांनी आंदोलनाला काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर!
वार्ताहर, लातूर
रेल्वे दरवाढीच्या विरोधात लातूर रेल्वेस्थानकावर जिल्हा काँग्रेसतर्फे बुधवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या आंदोलनाच्या रूपाने तब्बल १५ वर्षांनी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर आले. त्यामुळे आंदोलनापेक्षा याचीच अधिक चर्चा झाली.
युती सरकारच्या काळात दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. त्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेस पदाधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. कायम सत्तेत असल्यामुळे पदाधिकाऱ्यांना आंदोलन करणे माहिती नव्हते. त्यामुळे रेल रोको करताना घोषणा देण्यासाठी सामान्य कार्यकत्रे मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
‘अच्छे दिन आयेंगे’ या घोषणेने नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सत्ता मिळवली. मात्र, सत्ता हाती येताच सामान्यांच्या खिशाला कात्री लावली. रेल्वेच्या दरातील वाढ सामान्यांना परवडणारी नसून ती मागे घ्यावी, या मागणीसाठी परळी-मिरज रेल्वे लातूर स्थानकावर काही काळ अडवून धरत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी केली.
राज्य साक्षरता परिषदेचे अध्यक्ष अॅड. त्र्यंबकदास झंवर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. व्यंकट बेद्रे, शहराध्यक्ष अॅड. समद पटेल, जि. प. चे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, महापौर स्मिता खानापुरे, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष यशवंत पाटील, ‘विकास’चे उपाध्यक्ष विजय देशमुख, बाजार समिती सभापती विश्वंभर मुळे, पंचायत समिती सभापती मंगलप्रभा घाडगे, दगडू पडिले, सुनीता आरळीकर, नरेंद्र अग्रवाल आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. सामान्यांच्या प्रश्नावर यापुढे काँग्रेस अधिक आक्रमक आंदोलन करेल. गॅस व पेट्रोल दरातही वाढ होण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार असल्याचे जिल्हाध्यक्ष बेद्रे यांनी सांगितले.
काँग्रेसच्या आंदोलनात भाजपचा ‘जयजयकार’!
वार्ताहर, लातूर
आंदोलन व धिक्कार असो या घोषणांची सवय नसणाऱ्या काँग्रेसच्या मंडळींनी उदगीर येथे रेलरोको करताना मात्र भाजपच्या विजयाच्या घोषणा दिल्या! त्यामुळे आंदोलनस्थळी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही हशा पिकला.
उदगीर येथे नांदेड-बंगलोर रेल्वे अडवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वेच्या दरवाढीविरोधात रेलरोको आंदोलन केले. माजी आमदार चंद्रशेखर भोसले, तालुकाध्यक्ष रामकिशन सोनकांबळे, शिवाजी गुडे यांच्यासह सुमारे शंभरावर कार्यकत्रे रेलरोकोप्रसंगी उपस्थित होते. घोषणा दिल्यानंतर उपस्थितांनी नेमके काय म्हणायचे? हे सांगितले नसल्यामुळे ‘भारतीय जनता पक्षाचा..’ अशी घोषणा दिली जाताच ‘धिक्कार असो’ म्हणण्याऐवजी चक्क ‘विजय असो’ असा प्रतिध्वनी उमटला. या विसंगतीमुळे रेल्वेस्थानकावरील प्रवाशांमध्ये हशा पिकला. आंदोलनासाठी कधीही रस्त्यावर न उतरल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना कायम ‘विजय असो’ याच घोषणांची सवय असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ही चूक घडली. मात्र, बुधवारी उदगीर शहरात हा चांगलाच चच्रेचा विषय राहिला. यापुढे कार्यकर्त्यांना घोषणा काय द्यायच्या, याचेही प्रशिक्षण आता काँग्रेसला घ्यावे लागणार असल्याची चर्चा होत आहे.
रेल्वे दरवाढीविरुद्ध काँग्रेसतर्फे निदर्शने
प्रतिनिधी, औरंगाबाद
रेल्वे प्रवासी भाडे, मालवाहतूक भाडे व मासिक पासच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ औरंगाबाद शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे बुधवारी दुपारी औरंगाबाद रेल्वेस्थानकावर निदर्शने करण्यात आली.
‘अच्छे दिन आने वाले हैं’ असा प्रचार करणाऱ्या मोदी सरकारने सरकार स्थापन झाल्यावर एका महिन्यात दरवाढ करून सर्वसाधारण जनतेस वेठीस धरले, याचा निषेध करण्यासाठी दुपारी १२.४५च्या सुमारास औरंगाबाद रेल्वेस्थानकावर नगरसोल ते नरसापूर जलद गाडी तासभर अडविण्यात आली. या आंदोलनात औरंगाबाद शहर व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी सरकारविरुद्ध घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. निदर्शनानंतर रेल्वेप्रबंधकांना निवेदन देण्यात आले.