पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने परभणीत निषेध रॅली काढण्यात आली. काँग्रेस भवन ते शिवाजी चौक या दरम्यान मोटारसायकल ढकलत निषेध व्यक्त केला.
केंद्र सरकारने सत्तेवर येताच महिनाभरात रेल्वे प्रवासी भाडय़ात वाढ केली. त्यासोबतच आता पेट्रोल, डिझेलचेही दर वाढवले आहेत. सर्वसामान्य माणूस महागाईने त्रस्त असताना पेट्रोलच्या दरवाढीने तो हैराण झाला आहे. त्याच्या निषेधार्थ परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रविवारी शहरात निषेध रॅली काढण्यात आली. या रॅलीत कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन ते शिवाजी चौक या दरम्यान मोटारसायकल ढकलत नेत दरवाढीचा निषेध केला. या आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, मनपातील विरोधी पक्ष नेते भगवान वाघमारे, इरफान खान, बाळासाहेब फुलारी आदी सहभागी झाले होते.