काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सोमवारी (दि. ८) येथे येत असून, त्यांच्या उपस्थितीत पोखर्णी येथे मेळाव्याचे आयोजन केले आहे. बऱ्याच कालावधीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष परभणीत येत आहेत. माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर चव्हाण यांचा हा दौरा असून पोखर्णी हे मेळाव्याचे ठिकाणही वरपुडकरांच्याच कार्यक्षेत्रात येते.
प्रदेशाध्यक्षांचा दौरा पूर्वीच आखण्यात आला होता. तथापि माजी खासदार शेषराव देशमुख यांच्या निधनानंतर हा दौरा रद्द करण्यात आला. आता पुन्हा ते सोमवारी येथे येत आहेत. चव्हाण जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेस पक्षाची बठकही वरपुडकर यांच्या उपस्थितीत पार पडली. या वेळी चव्हाण यांना दौऱ्यात आपल्याकडे चहापानास आमंत्रित करण्यासाठी कार्यकर्त्यांची अहमहमिका सुरू झाली. चहापानाची तब्बल नऊ निमंत्रणे झाल्याने अखेर हे चहापानही रद्द करण्यात आले. आता चव्हाण पोखर्णी मेळाव्यास उपस्थित राहतील.
परभणी दौऱ्यात माजी खासदार तुकाराम रेंगे, जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांच्या निवासस्थानी अल्पोपाहार, भोजनाच्या निमित्ताने जातील. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मेळाव्यात चर्चा होईलच; एखाद्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची चव्हाण भेट घेण्याची शक्यता आहे. माजी खासदार शेषराव देशमुख, माजी उपमहापौर सज्जूलाला यांच्या निधनानंतर त्यांच्या निवासस्थानीही भेट देऊन चव्हाण हे संबंधित कुटुंबीयांचे सांत्वन करणार आहेत, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.