सांगली उपमहापौरपदासाठी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्याने पक्षांतर्गत खळखळ पुढे आली असून, या वेळी दगाफटका होऊ नये यासाठी काँग्रेस सदस्यासाठी व्हीप जारी करण्यात आला आहे. बंडखोरी शमविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार प्रयत्न सुरू झाले असले तरी या बंडखोरीला गृहीत धरण्याचे राजकारण नडल्याचे पुढे येत आहे.
महापौर व उपमहापौर निवडीसाठी शनिवारी महापालिका सदस्यांची विशेष बठक बोलावण्यात आली असून, महापालिकेत सत्ताधारी काँग्रेसचे ४२ सदस्य असून, स्वबळावर पदाधिकारी निवडीला कोणतीही अडचण येणार नाही असे प्रथमदर्शनी दिसत आहे. मात्र, पक्षांतर्गत असंतोष या निवडीनिमित्ताने उफाळून आला आहे. सांगलीवाडीच्या वंदना कदम यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी दाखल केली असून, त्यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रशांत पाटील यांच्या विरुद्ध उमेदवारी दाखल केली आहे.
महापालिकेत काँग्रेसचे संख्याबळ ४२ असले तरी विरोधी राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्यासह २५ सदस्य आहेत. मात्र यापकी अपक्ष धनपाल खोत भाजपत दाखल झाले आहेत, तर स्वाभिमानी विकास आघाडीतही भाजप आणि शिवसेना अशी विभागणी झाली आहे. या गटाचे पालिकेत सहयोगी सदस्यासह ११ सदस्य आहेत.
सांगली महापालिकेच्या पदाधिकारी निवडीत दगाफटका होऊ नये यासाठी काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार यांनी सदस्यांसाठी व्हीप जारी केला असून, अधिकृत उमेदवाराव्यतिरिक्त उमेदवाराला मतदान करणे अथवा अधिकृत उमेदवाराच्या अर्जावर सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षरी करणे कायद्यानुसार गर ठरणार असल्याच इशारा देण्यात आला आहे. मात्र बंडखोरी करणा-या वंदना कदम यांच्या उमेदवारीला काँग्रेसचे अतहर नायकवडी व अश्विनी कांबळे यांच्या सह्या आहेत. त्यामुळे पदाधिकारी निवड बिनधोक पार पडली तरी सत्ताधारी काँग्रेसमधील असंतोष नजीकच्या काळात शमण्याची चिन्हे नाहीत.