“मावळ आणि मुळशी येथील जमिनीला सोन्याचा भाव आहे. त्यामुळे या दोन भागांना महाराष्ट्रातील इतर ठिकाणी हॉट प्लेट म्हणून ओळखल जातं. चांगला विकास होत आहे. अनेक जण राहण्यासाठी येत आहेत. जमिनी विकून चार दिवस महागड्या मोटारीत फिराल पण पुढे काय? त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे पैसे दुप्पट झाले पाहिजेत या दृष्टीने काम करा. अन्यथा शिर्डीमध्ये मूळची माणसं शोधून सापडत नाहीत, तशीच अवस्था मावळ ची होऊ नये असं महसूलमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले. ते मावळमध्ये एका गृह प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

“शेती राहणार का नाही हा प्रश्न आहे. मावळ, मुळशी भागाला हॉट प्लेट म्हणतात. त्यामुळे हात लावाल तिथे चटका बसेल. इतकं गरम झालं आहे. अवघ्या महाराष्ट्रात हे दोन भाग सगळ्यात गरम आहेत. या भागात विकास होत आहे चांगलं आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिक या ठिकाणी राहण्यासाठी येत आहेत. मतदार संघाची संख्या दर पाच वर्षांनी ५० हजारांनी वाढतेय. अनेक जण नवीन येत आहेत. शिर्डीला मूळची माणसं शोधून सापडत नाहीत. उद्या, तुमची अशी अवस्था होऊ शकते…,” असंही थोरात म्हणाले. तेव्हा खाली बसलेल्या व्यक्तींनी झालेली आहे असं म्हटलं आणि एकच हशा पिकला.

“सर्वांनी एक काळजी घेतली पाहिजे. नव्या पिढीकडे चार पैसे येतील त्याची गुंतवणूक जास्त कशी वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे. आपली परिस्थिती आणखी चांगली कशी होईल हे पाहिलं पाहिजे. जमीन विकून पैसेही खूप मिळतील. त्या पैशातून बीएमडब्ल्यू घ्याल, चार दिवस त्यात फिराल. पण पुढं काय ? त्यामुळे काळजी घेतली पाहिजे. जे पैसे मिळतात त्याचे दुप्पट व्हावेत या दृष्टीने सर्वांनी काम करावं,” असंही ते म्हणाले.