प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली गाडी आढळल्याच्या प्रकरणातील तपासात काही गंभीर चुका पोलिसांकडून झाल्याने आणि या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी परमबीर सिंह यांची पोलीस आयुक्तपदावरून बदली केल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांना सांगितले. तर दुसरीकडे शिवसेना मात्र मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असं नाही सांगत त्यांची पाठराखण करत आहे. सचिन वाझे प्रकरणावरुन एकीकडे विरोधक सरकारला कोंडीत पकडत असताना काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीदेखील घरचा आहेर दिला आहे.

“…त्यामुळेच परमबीर सिंग यांच्यावर दिल्लीतील एका विशिष्ट लॉबीचा राग”

विरोधाभास वक्तव्यं सरकारची प्रतिमा खराब करत असून हे सत्ताधाऱ्यांच हप्ता वसुली कांड असल्याचं टीका संजय निरुपम यांनी केली आहे. याचे सर्व धागेदोरे शिवसेनेसोबत जोडलेले आहेत का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

सचिन वाझे आणि मनसुख हिरेन १७ फेब्रुवारीला १० मिनिटांसाठी भेटले होते; सीसीटीव्हीत कैद

“शिवसेना परमबीर सिंह यांचा जयजयकार करत आहे. गृहमंत्री जे राष्ट्रवादीचे आहेत त्यांनी आयुक्तांची चूक नसल्याचं सांगितलं आहे. ही विरोधाभास वक्तव्यं सरकारची प्रतिमा अजून मलीन करत आहेत. वाझे प्रकरणातील तपासावरुन आतापर्यंत हे सत्ताधाऱ्यांचं हप्ता वसुली कांड असल्याचं लक्षात येत आहे. याचे धागेदोरे शिवसेनेशी जोडले आहेत का?,” असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे.

सामना संपादकीयमध्ये काय आहे –
“पोलिसांसारख्या संस्था राज्याचा कणा असतात. त्याची प्रतिष्ठा सगळ्यांनीच सांभाळायची असते. विरोधी पक्ष महाराष्ट्राशी इमान राखून असेल तर ते पोलिसांची प्रतिष्ठा पणास लावून राजकारण करणार नाहीत. मनसुख प्रकरणामागचे पॉलिटिकल बॉस कोण, हा त्यांचा प्रश्न आहे. याचे उत्तर त्यांनीच शोधावे. पण अशा प्रकरणात कोणीच पॉलिटिकल बॉस नसतो. महाराष्ट्राची ही परंपरा नाही. मनसुखची हत्या झाली असेल तर गुन्हेगार सुटणार नाहीत. त्याने आत्महत्या केली असेल तर त्यामागच्या कारणांचा शोध घेतला जाईल व त्यासाठीच मुंबईसह राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत. विरोधी पक्षाने याची खात्री बाळगावी. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांना बदलले म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असे नाही. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे त्यांनी अत्यंत कठीण काळात हाती घेतली. करोना संकटाशी लढण्यासाठी त्यांनी पोलिसांत जोश निर्माण केला. धारावीसारख्या भागात ते स्वतः जात राहिले. सुशांत, कंगनासारख्या प्रकरणी त्यांनी पोलिसांचे धैर्य ढळू दिले नाही. त्यामुळे पुढे या प्रकरणात सीबीआय आली, तरी मुंबई पोलिसांच्या तपासापुढे सीबीआयला जाता आले नाही. टीआरपी घोटाळ्याची फाईल त्यांच्याच काळात उघडली. परमबीर सिंग यांच्यावर दिल्लीतील एका विशिष्ट लॉबीचा राग होता तो याच कारणांमुळे. त्यांच्या हाती जिलेटिनच्या २० कांड्या सापडल्या. त्या कांड्यांचा स्फोट न होताच पोलीस दलास हादरे बसले. नवे आयुक्त हेमंत नगराळे यांना हिमतीने व सावधगिरीने काम करावे लागेल,” असा सल्ला शिवसेनेनं नवनियुक्त पोलीस आयुक्तांना दिला आहे.