राज्यात आणि देश पातळीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नाव चर्चेत आहे. यामागाचं कारण म्हणजे गुरुवारी दिल्लीत शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करण्याची चर्चा रंगली होती. लवकरच शरद पवार युपीएच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्विकारतील असा दावा केला जात आहे. मात्र यादरम्यान राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने धक्कादायक आरोप केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी काँग्रेसला संपवण्याचा मोठा कट सुरु असल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा राहुल गांधींविरोधातील मोहिमेचा भाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

“शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले तर…,” संजय राऊतांचं मोठं विधान
शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

संजय निरुपम यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधींविरोधात एक मोहिम सुरु असून शरद पवार यांना युपीए अध्यक्ष करण्याची चर्चा हा त्याचाच एक भाग आहे. याच मोहिमेअंतर्गत २३ स्वाक्षऱ्या असणारी चिठ्टी लिहिण्यात आली होती. यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात सुसंगततेची कमतरता शोधण्यात आली. काँग्रेसला संपवण्याचा एक मोठा कट आहे”.

राष्ट्रवादी काँग्रेसने फेटाळलं वृत्त –
राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र शरद पवारांसंबंधीच्या बातम्या निराधार असल्याचं सांगत वृत्त फेटाळून लावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तापसे यांनी प्रसारमाध्यमांनी निर्धास्तपणे शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याचं वृत्त दिल्याचं म्हटलं आहे. “युपीएमध्ये अशा प्रस्तावासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही हे राष्ट्रवादी काँग्रेस स्पष्ट करु इच्छित आहे,” असं महेश तपासे यांनी म्हटलं आहे.

“सध्या देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन लक्ष हटवण्यासाठी काहीजणांनी हेतू परस्पर ही बातमी पेरली असल्याचं दिसत आहे,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.