आधी उमेदवारीसाठी स्पर्धा, आता उमेदवाराची शोधाशोध

दिगंबर शिंदे, सांगली</strong>

‘काटय़ाच्या अणीवर वसली तीन गावे, दोन ओसाड, एक वसेचना’ अशी अवस्था सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीची झाली आहे. १९६२ पासून २०१४ पर्यंत काँग्रेसने पराभव न बघितलेल्या या मतदारंसघात एकेकाळी उमेदवारीसाठी रस्सीखेच व्हायची, पण आता ती कोणाच्या गळ्यात मारायची, अशी गत आहे.

निवडणूक जाहीर होण्यापुर्वीच भाजपने नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबविण्यास प्रारंभ केला असून पक्षांतर्गत मतभेद बाहेर पडणार नाहीत, याची दक्षता घेतली जात आहे. विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी अंतर्गत घुसळणही मोठय़ा प्रमाणात सुरू आहे. यामुळे भाजपची उमेदवारीही निश्चित झाली आहे, असे मानले जात  नाही.

दुसऱ्या बाजूला काँग्रेसला उमेदवारी निश्चित करण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे विश्वासार्हतेचा प्रश्न उभा ठाकला असून वसंतदादा गटाकडून आमदार विश्वजित कदम यांचे नाव पुढे सरकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर कदम यांनी उमेदवारी स्वीकारण्यास असमर्थता दर्शवून विधानसभेलाच प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत.

काँग्रेसमध्ये उमेदवारी कोणाला द्यायची, यावर खल सुरू असताना अचानक नगरच्या बदल्यात राष्ट्रवादीला जागा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पक्षातर्फे क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुणअण्णा लाड यांचे नाव चच्रेत आले असतानाच सांगलीच्या जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हक्क सांगून माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे नाव पुढे आणले आहे.

सांगली मतदारसंघातून डॉ. पतंगराव कदम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची पक्षाची दोन वर्षांपूर्वी योजना होती.  त्यांना तशी कल्पनाही देण्यात आली होती. पण गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले. यामुळे जिल्ह्य़ात काँग्रेस नेतृत्वहीन झाला. डॉ. कदम यांचे राजकीय वारस म्हणून विश्वजित कदम यांनी सूत्रे स्वीकारली तरी वडिलांप्रमाणे ते तेवढे आक्रमक नाहीत. लोकसभा निवडणूक लढावी म्हणून पक्षाने त्यांना गळ घातली असली तरी राज्याच्या राजकारणात राहण्याची त्यांची इच्छा आहे. डॉ. कदम यांच्या बंधूच्या नावाचा प्रस्ताव आला होता, पण त्यांची प्रकृती साथ देत नाही.

माजी खासदार प्रतीक पाटील यांचे नाव स्पर्धेतून बाद झाले. त्यांचे बंधू विशाल पाटील यांच्या नावाची चर्चा असली तरी त्यांना विधानसभेचे वेध लागले आहेत. पृथ्वीराज पाटील यांच्या नावावर पक्षात चर्चा सुरू आहे.

मध्यंतरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीतून लढावे, असा प्रस्ताव आला होता. पण त्यांनी सांगलीचा पर्याय मान्य केला नाही. पक्षांतर्गत वाद मिटत नसल्यानेच अलीकडेच पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगली काँग्रेसमधील सर्व मुख्य नेत्यांना एकत्र बसवून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

पक्षासाठी सांगलीची जागा प्रतिष्ठेची असल्याने उमेदवारीवर तोडगा निघेल आणि आम्हीच जिंकू, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.