काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्ष प्रभावती ओझा यांचे गुरुवारी रात्री नागपूरमध्ये निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या.

प्रभावती ओझा या गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर नागपूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा रामकिशन ओझा, मुलगी लता शर्मा व नातवंडे असा परिवार आहे. रामकिशन ओझा हे काँग्रेसचे प्रदेश सचिव आहेत.

प्रभावती ओझा यांनी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या  सदस्य, हिमाचल  प्रदेशसह विविध राज्यात पक्षाच्या निरीक्षक म्हणून काम केले होते. याशिवाय विविध संस्थांच्या संचालकपदीही त्यांनी काम केले होते.