उस्मानाबाद : सत्तेतील शिवसेना किंवा काँग्रेसने आगामी काळात स्वबळाचा नारा दिल्याची माहिती कानावर पडली आहे. परंतु तसे असेल तर हा त्यांचा नारा टिकणारा नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

तुळजापूर येथून त्यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद सुरू केला असून तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन लोहारा व तुळजापूर तालुक्यांतील कार्यकत्र्यांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसºया दौºयाची सुरुवात आज झाली आहे. करोनाचे संकट लवकर दूर होवो व लोकांना जगण्यासाठी नवी उमेद मिळो, असे तुळजाभवानीला साकडे घातले असून हा दौरा म्हणजे काही राष्ट्रवादीकडून स्वबळासाठी चाचपणी नाही. सत्तेतील तिन्ही पक्ष एकत्र असून काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा स्वबळाचा नारा शेवटपर्यंत टिकणार नाही. शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र राहतील व काँग्रेसही आमच्याबरोबर राहील, यासाठी प्रयत्न राहील, असे पाटील म्हणाले.

राज्यात अनेक ठिकाणी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास अनेक जण इच्छुक आहेत. सोलापुरातही एमआयएमचा मोठा गट प्रवेश करण्यासाठी तयार आहे. परंतु हे जाहीर प्रवेश असल्याने मोठी गर्दी होणार असल्याने करोनाचा प्रभाव कमी झाल्यावर प्रवेश सोहळा होईल, असे त्यांनी सांगितले.