२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनण्यापूर्वी देशात भ्रष्टाचाराविरूधात लोकांमध्ये संतापाची लाट दिसून आली होती. विशेषतः २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत टू-जी स्पेक्ट्रम घोटाळाही खूप गाजला होता. देशातील भ्रष्टाचाराविरोधात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात दिल्लीत आंदोलन करण्यात आलं होतं. या सगळ्या घटना एकदम आठवण्याचं कारण म्हणजे या सगळ्या गोष्टींना एकत्र मांडत काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केलं आहे. न झालेल्या घोटाळ्यातून मोदी यांनी देशाला मुर्ख बनवलं, असा आरोप काँग्रेसनं केला आहे.

युवक काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवर २०१४ मध्ये प्रचंड गाजलेल्या टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्यासंदर्भातील एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओतून काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला. कधी न झालेल्या घोटाळ्यावरून मोदींनी देशाला मुर्ख बनवलं, असंही म्हटलं आहे. या व्हिडीओ टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेक व्यक्तींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या न झालेल्या घोटाळ्यातून त्यांना काय लाभ मिळाला, याविषयीही भाष्य केलं आहे.

काय म्हटलंय व्हिडीओमध्ये?

मजाक काय असतो? अशा ओळींनी व्हिडीओची सुरूवात होते. त्यानंतर निवेदन स्वरूपात गोष्ट सुरू होते. ही सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका व्यक्तीनं सांगितलं की, १ लाख ७६ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. दुसऱ्या व्यक्तीनं हा घोटाळा जनतेला समजावून सांगण्यासाठी आंदोलन सुरू केलं. या दुसऱ्या व्यक्तीसोबत तिसरी महिला आणि चौथा आणखी एक व्यक्ती होता. यात पाचव्या व्यक्तीनं टू-जी घोटाळा जनतेला समजावून सांगण्यासाठी देशाचा आधार घेऊन आणखी एक आंदोलन चालवलं. सहाव्या व्यक्तीनं या घोटाळ्याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मग नंतर सातव्या माणसाची यात प्रवेश झाला. ही सातवी व्यक्तीनं या सर्व सहा व्यक्तींची मेहनत एकत्र करून जनतेसमोर गेली आणि तिने या घोटाळ्या विरोधात मतं मागितली. आज सात वर्षानंतर… घोटाळ्यातील सर्व आरोपी निर्दोष सुटले. कारण घोटाळा झालेलाच नव्हता.

या घोटाळ्यातून कुणाला काय मिळालं?

पहिला व्यक्ती पद्मभूषण पुरस्कार घेऊन बँक बोर्डाचा बॉस बनला आहे. दुसरा व्यक्ती झेड प्लस सुरक्षा घेऊन चूप बसला आहे. तिसरी महिला उप राज्यपाल बनली आहे. चौथ्या व्यक्तीच्या वाट्याला दिल्लीचं मुख्यमंत्रीपद आलं आहे. पाचवा व्यक्ती यशस्वी उद्योगपती झाला आहे. जो सहावा व्यक्ती होता तो खासदार बनला. सातव्या व्यक्तीच्या वाट्याला आलं पंतप्रधानपद. आम्हाला व तुम्हाला काय मिळालं? आपण बनलो मुर्ख. त्यामुळे खऱ्या अर्थानं मजाक याला म्हणतात,” असं म्हणत काँग्रेसनं कॅगचे तत्कालीन महानिरीक्षक विनोद रॉय, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, उप राज्यपाल किरण बेदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, योगगुरू बाबा रामदेव, भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर न झालेल्या घोटाळ्यावरून देशाला मुर्ख बनवल्याचा ठपका ठेवला आहे.