दुरावलेल्या समाजघटकांना जोडण्याचे प्रयत्न

मधु कांबळे, मुंबई</strong>

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेसमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा कसा सामना करायचा, यावर मोठा खल सुरू आहे. काँग्रेसचा जनाधार कमी झाला आहे, हे लोकसभा निवडणूक निकालाने दाखवून दिले आहे. त्यामुळे दुरावलेल्या विविध समाज घटकांना पुन्हा पक्षाशी जोडण्यासाठी ‘सोशल इंजिनीअरिंग’वर भर देण्याचे काँग्रेसने ठरविले आहे.

लोकसभा निवडणुकीत देशात आणि राज्यातही काँग्रेसला पराभवाचा जोरदार तडाखा बसला. राज्यात चार-पाच मतदारसंघ वगळले तर, भाजप-शिवसेनेशी तुल्यबळ लढत देतील, असे उमेदवार दिले होते. तरीही चंद्रपूरचा अपवाद वगळता, काँग्रेसची सर्वत्र धूळधाण झाली. त्यामुळे अगदी तीन-चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीला कसे सामोरे जायचे, याची चिंता काँग्रेसला लागली आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि विधानसभा निवडणुकीला कसे सामोरे जायचे, यावर चर्चा करण्यासाठी गुरुवारी काँग्रेसचे नेते, लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि महत्त्वाचे पदाधिकारी यांच्या दिवसभर बैठका झाल्या.

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची बैठक घेतली. बैठकीचा विषय उमेदवारांना आधीच कळविण्यात आला होता. त्यात पराभवाची कारणे काय, अशी विचारणा करण्यात आली होती. मित्रपक्षांनी योग्य सहकार्य केले किंवा नाही, याबद्दलही खुलेपणाने मते मांडावीत, असे सांगण्यात आले. काही उमेदवारांनी वंचित आघाडीचा फटका बसल्याचे सांगितले, तर काही उमेदवारांनी काँग्रेसकडे कोणता समाज राहिला आहे ते सांगावे, असा प्रश्न उपस्थित केला. काँग्रेसचा परंपरागत पाठीराखा म्हटला जाणारा, दलित, आदिवासी, मुस्लीम समाजही पक्षासोबत राहिलेला नाही. ओबीसी, मराठा समाज मोठय़ा संख्येने भाजप-शिवसेनेकडे वळल्याचे काही उमेदवारांनी निदर्शनास आणले.

आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना पुढे आल्या आहेत. वंचित आघाडी सोबत येणार नाही, परंतु प्रयत्न करायला हरकत नाही, असे मत काहींनी मांडले. वंचित आघाडी सोबत आली नाही, तर काय करायचे, यावरही बराच खल झाला. त्यातून दुरावलेल्या सर्वच समाज घटकांना पुन्हा पक्षाशी जोडण्यासाठी ‘सोशल इंजिनीअरिंग’ करण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी खासदार जयवंतराव आवळे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, एकनाथ गायकवाड, भाई नगराळे, वर्षां गायकवाड, शरद रणपिसे आदी काँग्रेसमधील दलित-मागासवर्गीय नेत्यांची रविवारी बैठक होणार आहे. ‘सोशल इंजिनीअरिंग’चे नेमके सूत्र काय असावे, यावर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे, असे सांगण्यात आले.

राज ठाकरेंबद्दल चांगली मते

निवडणुकीत मित्रपक्षांनी योग्य सहकार्य केले का, अशी विचारणा काँग्रेस उमेदवारांना बैठकीत करण्यात आली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बऱ्या-वाईट अशा संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. राज ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात सभा घेऊन काँग्रेसला अनुकूल वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा लाभ काँग्रेसला झाला नाही, असा सूर बैठकीत होता. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी चांगले सहकार्य केल्याचेही काही उमेदवारांनी सांगितले. बैठकीत सर्वच उमेदवारांनी राज ठाकरे यांच्याबद्दल चांगली मते व्यक्त केली.