News Flash

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कॉग्रेस कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीला प्रश्न

लोकसभा निवडणुका आल्या की, मते मागण्यापुरतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आठवण येते, असा सवाल अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

| April 2, 2014 10:12 am

पाच वर्ष आम्हाला नेहमीच दुय्यम वागणूक दिली जाते. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढविणे म्हणजे काँग्रेसचे खच्चीकरण होय, अशी भावना तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या नाराजीचा फटका अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निश्चित बसणार, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

ग्रामपंचायत निवडणूक असो की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेकदा राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या सोयीनुसार काँग्रेसशी युती करतात. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत तर काँग्रेसला हरविण्याचे काम राष्ट्रवादीनेच केल्याचा आरोप केला जातो. जेथे राष्ट्रवादीची ताकद आहे तेथे काँग्रेसची साधी विचारपूस होत नाही. केवळ ग्रामीण भागात तळागळापर्यंत काँग्रेसचे मतदार असल्यामुळेच सध्या काँग्रेस तालुक्यात तग धरून आहे. अन्यथा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पशाच्या बळावर राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसच्या मतदारांना अधिक प्रमाणत फोडाफोडीचे राजकारण करतो. एवढेच नव्हे, तर तालुका व जिल्हा पातळीवरील विविध समित्यांची अध्यक्षपदे किती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिलेली आहेत ते राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगावे, असाही सवाल तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेला आहे. सध्या संजय गांधी निराधार योजनेच्या समितीपासून जिल्ह्य़ाच्या रोहयो समिती असो की, नियोजन समिती प्रत्येक ठिकाणी बहुसंख्य राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाते आणि एखाद ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांची निवड करून काँग्रेससमोर उपकाराचा तुकडा देण्याचेच काम राष्ट्रवादीने केल्याची भावना तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जेव्हा केव्हा स्वार्थाचे राजकारण असते तेव्हा काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांशी हातमिळवणी करून स्वतच्या फायद्याचे निर्णय स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांवर लादले जातात. त्यामुळेच ग्रामपंचायत असो की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांना काँग्रेसला घेणे चालत नाही, तर केवळ लोकसभा, विधानसभा निवडणुकीतच यांना आम्ही कसे चालतो, असा परखड सवालही काँग्रेस पदाधिकारी आपसात बोलतांना करतात. गोंदिया जिल्ह्य़ात अनेकदा राष्ट्रवादीतर्फे विविध मेळावे व कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यासाठी देशपातळीवरील विविध मान्यवर नेत्यांना आमंत्रित केले जाते, परंतु या मेळाव्यात व सत्कार समारंभात काँग्रेस नेत्यांना व कार्यकर्त्यांना केवळ दुय्यम वाणगूक दिली जात असल्याचीही काँग्रेस कार्यकर्त्यांची तक्रार आहे.
गोंदिया जिल्हयाचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे आहे. हे पालकमंत्री केवळ राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांना किंवा झेंडावदंनालाच जिल्ह्य़ात येतात. अर्जुनी मोरगाव तालुक्यात नसíगक आपत्ती असो किंवा वाघाने निर्माण केलेल्या दशहत असो सामान्यांचे दु:ख जाणून घेण्यासाठी त्यांना वेळ नाही. तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यास त्यांना रस नाही. केवळ कंपनीत बसून राष्ट्रवादीच्या समस्यांचे निराकरण करण्यातच धन्यता मानणाऱ्या पालकमंत्र्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांची आठवण येत नसल्याचाही आरोप होतो. एवढेच नव्हे, तर तालुक्यातील एका जबाबदार पदाधिकाऱ्याने तर प्रस्तुत वार्ताहरांशी बोलताना सांगितले की, आता या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा डोळा अर्जुनी मोरगाव विधानसभा स्वतकडे खेचण्याचा असून तशी विचारणाही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी केलेली आहे. सध्या अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या कोटय़ात आहे. या नाराजीमुळेच की काय, बोटावर मोजण्याएवढेच तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज बाहेर पडलेले दिसतात, तर काही प्रचारासाठी फिरण्याचा देखावा दाखवितात. त्यामुळेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ही नाराजीच राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अडचणीची ठरू शकते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2014 10:12 am

Web Title: congress supporters questions ncp
Next Stories
1 कोपरगाव येथे भीषण अपघातात ४ ठार
2 वाकचौरेंकडून निवडणूक आयोगालाच साकडे
3 ‘उमेदवाराचा संबंध नाही, पक्षाकडून रिक्षाभाडे वाटप’
Just Now!
X