अजूनही मोदीबाबाची थोडी हवा आहे असं वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. सोलापुरातील औज येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. नरेंद्र मोदींनी माझ्यासारख्या माणसावरही जादू केली होती असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे. शिवसेनेसारख्या पक्षाला किमान समान कार्यक्रमात समाविष्ट करुन आम्ही राज्यात धर्मनिरपेक्ष सरकार आणलं असं यावेळी त्यांनी म्हटलं.

“राज्यात धर्मनिरपेक्ष सरकार आणण्याचा आपण प्रयत्न केला. त्याची ही सुरुवात आहे. म्हणून आता आपल्यावर जबाबदारी वाढली आहे. अजून मोदीबाबाची थोडी थोडी हवा आहे याची मला कल्पना आहे. त्यांनी आमच्यावरही जादू केली होती. माझ्यासारख्या माणसावरही त्यांनी जादू केली होती. पहिली दोन वर्ष मीदेखील चांगलं काम करत आहेत असं म्हणत होतो. पण जेव्हा देशाची आर्थिक स्थिती बिघडू लागली, तरुणांना रोजगार देताना दिशाभूल होऊ लागली. जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. धर्माच्या बाबतीतही देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. म्हणून आपण अतिशय सावध असलं पाहिजे,” असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे.

यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीवर बोलताना सांगितलं की, “आता आपण टीव्हीवर ऐकलं असेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येथे आले होते. मोदींनी त्यांच्या स्वागतासाठी केलेल्या भाषणात आपल्या आणि ट्रम्प यांच्या मैत्रीवर बोलत होते. म्हणून कुणीतरी विचारलं, तुम्हाला ट्रम्प पाहिजे की अमेरिकन जनता पाहिजे. वैयक्तिक मैत्री असू शकते यात काही वाद नाही. पण अमेरिकन जनता तुमच्यासोबत आहे का ? हा प्रश्नही आमच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे”.