आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या शुभारंभाचा कार्यक्रम काँग्रेसने लाटल्याने कस्तुरचंद पार्क या कार्यक्रमस्थळी गुरुवारी केवळ काँग्रेसमय वातावरण होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कुठेच दिसू नये, यासाठी काँग्रेसने सुरुवातीपासूनच पुरेपूर प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी झाल्याची चर्चा परिसरात होती. या योजनेचा लोकार्पण सोहळा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रमुख उपस्थित अतिशय थाटामाटात साजरा झाला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या कार्यक्रमाच्या आखणीपासून कार्यक्रमावर काँग्रेसचा वरचष्मा राहील, याची खबरदारी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना टाळून बैठका घेतल्या. त्यामुळे राष्ट्रवादीने बहिष्काराची तयारी केली होती. मात्र, प्रत्यक्षात कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनिल देशमुख, फौजिया खान उपस्थित होते. सोनिया गांधी यांचे आगमन होताच त्यांनी प्रथम काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांशी हस्तांदोलन केले. मात्र, राष्ट्रवादीच्या या चार नेत्यांकडे त्या फिरकल्यासुद्धा नाहीत.
कार्यक्रमात केवळ काँग्रेसचा जयजयकार होत असताना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नावाचा मात्र कुठेच उल्लेख होत नव्हता. सोनिया गांधी यांच्या शेजारी मात्र प्रफुल्ल पटेल यांना बसविण्यात आले होते. या वेळी पटेल यांनी राज्य सरकारचे कौतुक भाषणात केले. सोनियांनी मात्र आपल्या भाषणात पवारांचा उल्लेखही केला नाही.
राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, काँग्रेसने आम्हाला दूर ठेवून कार्यक्रम हायजॅक केला असला तरी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार आमचे मंत्री कार्यक्रमाला उपस्थित होते.

चार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते नागपुरात ‘राजीव गांधी जीवनदायी योजने’चा शुभारंभ होण्याच्या पूर्वसंध्येला विदर्भात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यवतमाळ जिल्ह्य़ातील बोथबोडन येथील वसराम राठोड, वर्धा जिल्ह्य़ातील नंदोरी येथील सुरेश अंबरवेले, लोणारा येथील विनोद महाकुलकर आणि वाशीम जिल्ह्य़ातील वाघोळा येथील संजय गावंडे अशी त्यांची नावे आहेत. नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपविले.