मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करणार आहे. २१ ऑगस्टपासून नंदूरबारमधून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. मात्र त्याआधीच मुख्यमंत्र्यांच्या या यात्रेला उत्तर देण्यासाठी २० ऑगस्टपासून काँग्रेस राज्यभरामध्ये पोलखोल यात्रा काढणार आहेत. काँग्रसचे नेते नाना पटोले यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोजरी गावातून मुख्यमंत्र्यांनी आपल्या महाजनादेश यात्रेला सुरुवात केली होती तेथून काँग्रेसही पोलखोल यात्रा सुरु करणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. ‘राजीव गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच २० ऑगस्टपासून काँग्रेस महाराष्ट्रामध्ये पोलखोल यात्रेला प्रारंभ करणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोजरीमधूनच आपल्या यात्रेला सुरुवात करुन अनेक खोटे मुद्दे आपल्या भाषणामधून मांडले. मागील पाच वर्षांमध्ये मी महाराष्ट्राचा दुप्पट विकास केल्याचा दावा त्यांनी या यात्रेमध्ये केला. मात्र हे दावे खोटे असल्याचे आम्ही दाखवून देणार आहोत.,’ असं पटोले यांनी सांगितलं.

पोलखोल यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दाव्यांची पोलखोल करणार म्हणजे नक्की काय करणार यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना पटोले यांनी सरकारी आकडेवारीच्या माध्यमातूनच पोलखोल करणार असल्याचे सांगितले. “जनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यात आठ हजार कोटीची गुंतवणूक आणल्याचे सांगितले. मात्र त्यांनी आठ रुपयांची तरी गुंतवणूक राज्यात आणली का?” असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला. “मुख्यमंत्री या महाजनादेश यात्रेदरम्यान जे दावे करत आहेत ते कसे खोटे आहेत हे आम्ही जनतेला दाखवून देणार आहोत,” असं पटोले यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कोल्हापूर आणि सांगलीतील पुरामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रा अर्ध्यावर सोडत मुंबई गाठली होती. कोल्हापूर आणि सांगलीतील पुराचं पाणी ओसरलं असून परिस्थिती सर्वसामान्य होत आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा निवडणूक प्रचाराकडे वळवला आहे. २१ ऑगस्टपासून नंदूरबारमधून मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे अशी माहिती महाजनादेश यात्रेचे नियोजन प्रमुख सुरजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे.