अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समविचारी पक्षांना जवळ करण्याची रणनीती कॉँग्रेसने आखली. त्याचाच भाग म्हणून आघाडीमध्ये भारिप-बहुजन महासंघाला सामावून घेण्यासाठी कॉँग्रेसकडून अ‍ॅड्.प्रकाश आंबेडकरांना जवळ करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यातील अनेक मतदारसंघांत त्यांची मतपेढी आहे. मात्र, आघाडीसाठी अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकरांकडून विशेष महत्त्व दिले जात नसल्याचे कॉँग्रेसचे म्हणणे आहे. कॉँग्रेसकडून कोणत्याही प्रकारची बोलणी झाली नसल्याचे भारिपने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या आघाडीचे तळ्यात-मळ्यात आहे.

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांची मोट बांधून एकत्रितपणे भाजपच्या विरोधात उभे राहण्याचे कॉँग्रेसचे धोरण आहे. त्यामुळे भारिप-बमसंची साथ मिळावी यासाठी कॉँग्रेसचे प्रयत्न आहेत. राज्यातील लोकसभेच्या व विधानसभेच्या अनेक मतदारसंघांवर भारिप-बमसंची भूमिका निर्णायक ठरू शकते. २००४, २००९ व २०१४ च्या सलग तीन निवडणुकांत भारिप-बमसंने अकोला लोकसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवली. त्याचा फटका कॉँग्रेसला बसला. तिन्ही निवडणुकांत कॉँग्रेसकडून आघाडी करण्यासंदर्भात बोलणीचे सत्र चालले, मात्र भारिप-बमसंसोबत आघाडी होऊ शकली नाही. त्यामुळे निवडणूक रिंगणात अंतिम क्षणी उमेदवार उतरवण्याची नामुष्की कॉँग्रेसवर ओढावली. त्यापूर्वी १९९८ व १९९९ मध्ये अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर यांनी कॉँग्रेसच्या पाठिंब्यावर लोकसभा गाठली. दरम्यानच्या काळात राज्यातील भारिप-बमसंचे आमदार फोडण्याचे कृत्य कॉँग्रेसने केले. त्यानंतर अ‍ॅड्. आंबेडकर यांनी कायमच कॉँग्रेसपासून दुरावा ठेवला. आता पुन्हा एकदा कॉँग्रेसकडून भारिप-बमसंशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

भारिप-बमसंचा अकोला मतदारसंघावर प्रभाव आहे. त्यामुळे गत तीन निवडणुकांत भाजप, भारिप-बमसं व कॉँग्रेसमध्ये तिहेरी लढत झाल्याचा इतिहास आहे. याशिवाय बुलढाणा, वाशीम-यवतमाळ, हिंगोली, नांदेड आदी मतदारसंघांतही बऱ्यापैकी ताकद आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांचे चिरंजीव राहुल ठाकरे यांची वाशीम-यवतमाळ मतदारसंघातून तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघामध्ये भारिप-बमसंच्या मतांचा आधार मिळून वातावरण अनुकूल करण्याकडे कॉँग्रेस नेत्यांचा कल आहे. भारिप-बमसं आघाडीत सहभागी झाल्यास या सर्व ठिकाणी कॉँग्रेसला फायदा होऊ शकतो.

पश्चिम विदर्भात अकोल्यात कॉँग्रेसकडे तर, बुलढाण्यात राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवाराचा अभाव जाणवतो. त्यामुळे भारिप-बमसंने आघाडीत जाण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्यासाठी अकोला व बुलढाणा मतदारसंघ सोडण्याची तयारीदेखील कॉँग्रेसने दर्शविल्याची माहिती आहे. अकोल्यात कॉँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय भारिप-बमसंला लोकसभा जिंकता आली नाही, हे वास्तव आहे, तर कॉँग्रेसलाही मतांचे विभाजन टाळण्यासाठी भारिप-बमसंच्या मदतीची गरज आहे. भारिप-बमसंला सोबत घेण्यासाठी त्यांच्याशी बोलणी करण्यात वारंवार पुढाकार घेतला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे कॉँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी कॉँग्रेसकडून कोणत्याही प्रकारची बोलणी होत नसल्याचे सांगितले.

राष्ट्रवादीची भूमिकाही महत्त्वाची

आगामी निवडणुकांसाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित आहे. दोन्ही पक्षांकडून समविचारी पक्षांना जवळ करण्याचे प्रयत्न करण्यात येतात. मात्र, शरद पवार आणि अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर यांचे फारसे जुळत नाही. काही दिवसांपूर्वीच अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खरमरीत टीका केली. त्यामुळे भारिप-बमसंच्या आघाडीतील समावेशासंदर्भात राष्ट्रवादीची नेमकी काय भूमिका राहते? हा मुद्दादेखील महत्त्वाचा ठरणार आहे.

केंद्रीय नेत्यांच्या चर्चेवरून आघाडीचे घोडे अडले?

कॉँग्रेसच्या केंद्रीय स्तरावरील नेत्यांच्या बोलणीवरून भारिप-बमसंसोबतच्या आघाडीचे घोडे अडल्याचा तर्क लावण्यात येत आहे. अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर भारिप-बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे आघाडीसंदर्भात कॉँग्रेसकडून सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांनी बोलणी करावी, अशी भूमिका भारिप-बमसंने वारंवार जाहीर केली. आता राहुल गांधी व अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर यांच्यात बोलणी घडवून आणण्यासाठी खा. अशोक चव्हाण प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.

भारिप-बमसंसोबत आघाडी करण्याची कॉँग्रेसची पूर्ण तयारी आहे. यापूर्वीही कॉँग्रेसने वारंवार प्रयत्न केले आहेत. मात्र, भारिप-बमसंकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाल्यास आम्ही बोलणी करण्यासाठी तयार आहोत.

– खा. अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, कॉँग्रेस

आघाडी करण्यासाठी उत्सुक असल्याचा कॉँग्रेसकडून केवळ देखावा करण्यात येतो. गेल्या लोकसभा निवडणूकांत परिपूर्ण प्रस्ताव दिला होता. तरीही कॉँग्रेसने अकोल्यात मुस्लीम उमेदवार दिला, याचा कॉँग्रेसने प्रथम खुलासा करावा.

– अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष, भारिप-बमसं.