पाऊणकरांच्या कृतीची चंद्रपूरमध्ये उलटसुलट चर्चा

चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेले चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी केरळ पूरग्रस्तांसाठीचा ५१ लाखांचा निधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अथवा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे देण्याऐवजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केल्याने काँग्रेसच्या वर्तुळात उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आशीर्वादाने मनोहर पाऊणकर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कायम आहेत. संचालकांनी एकत्र येत पाऊणकरांना पदावरून खाली खेचण्यासाठी प्रयत्न केले होते. एकवेळ अविश्वास ठरावाचाही प्रयत्न झाला. मात्र, पालकमंत्री पाठीशी असल्याने पाऊणकरांना जीवदान मिळाले. चंद्रपूर जिल्हा बँकेवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. पाऊणकर हे सुद्धा काँग्रेस पक्षाचेच आहेत. तसेच सर्वाधिक संचालक काँग्रेस पक्षाचेच आहेत. नुकतीच संचालक मंडळाची बैठक झाली. त्यात पूरग्रस्त केरळ राज्याला आर्थिक मदत देण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. सर्व संचालकांच्या अनुमतीने ५१ लाखाचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला.  राज्यात सहकार क्षेत्रात केरळ ला मदत देण्याचा निर्णय झाला. ही मदत राहुल गांधी किंवा अशोक चव्हाण यांच्या हस्ते केरळला देण्यात येईल असे सर्व संचालक मंडळांना वाटत होते . मात्र पाऊणकर यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत एका कार्यक्रमात धनादेश दिला. यावेळी सोबत भाजपचे संचालक गजानन पाथेडे होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे.

 

पाऊणकर नेमके कोणाचे?

एकीकडे पाऊणकर लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत. यांनी नुकतीच दिल्ली व मुंबई येथे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. तसेच माजी खासदार नरेश पुगलिया गटाला सोडून सध्या विधिमंडळ उपनेते विजय वडेट्टीवार यांच्या गटाशी जुळवून घेतले आहे. एकीकडे काँग्रेसच्या उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू असतानाच दुसरीकडे भाजप नेत्यांसोबतही त्यांनी संबंध वाढवणे सुरू ठेवले आहे. निधी देण्याशिवाय त्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेत बँकेच्यावतीने स्वतंत्र सहभाग घेतला होता.  तसेच भाजप नेत्यांच्या वाढदिवसाला बँकेच्यावतीने शहरात मोठमोठे होर्डिगही लावले होते.  एकीकडे वडेट्टीवार यांच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थिती लावायची, दुसरीकडे भाजप नेत्यांच्या सर्व कार्यक्रमांमध्ये हिरिरीने सहभागी व्हायचे. त्यांना आर्थिक मदत करायची, तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनाही पाठबळ द्यायचे. त्यामुळे पाऊणकर नेमके कोणाचे, या प्रश्नावर राजकीय वर्तळात चर्चा सुरू आहे.