OBC Reservation: ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशी ओबीसी नेत्यांची मागणी असून या मागणीवर मागणीवर सरकार सकारात्मक असल्याचं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसमारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे, दरम्यान यावेळी त्यांनी OBC आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही असा इशाराही दिला आहे.

“यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. या चर्चेत मी आणि भुजबळ होतो. जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचा तिढा सुटत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका आम्ही माडंली आहे. ही चर्चा सकारात्मक झाली आहे. निवडणुका पुढे ढकलण्याच्या चर्चेसंदर्भात सरकार सकारत्मक आहे. कोणाचा कितीही दबाब आला तरी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुटेपर्यंत या निवडणुका होऊ नयेत आणि मंत्री असलो तरी या निवडणुका होऊ देणार नाही अशी आमची स्पष्ट भूमिका आहे,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

करोना संपेपर्यंत सर्वसामान्यांना मुंबई लोकल प्रवासबंदी?; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

दरम्यान यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी करोना संपेपर्यंत मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार नाही असं सांगितलं आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर शिवसेना पुन्हा भाजपासोबत जाण्याच्या चर्चेवर ते म्हणाले की, “काहीही झालं तरी पुढचे साडेतीन वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहणार आहेत. कितीही ईडी आणि सीबीआयचा दबाव आणला तरी तुम्ही स्वप्न बघत राहा. आमची वाटचाल सुरूच राहील”. केंद्रीय संस्था कशाप्रकारे वागत आहेत, हे दाखवण्यासाठी सरनाईक यांचं पत्र आहे असं वाटत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.