राज्यावरील करोना संकट अद्यापही पूर्ण टळलेलं नसून निर्बंध शिथील केले असले तरीही नियमांचं उल्लंघन करु नका असं वारंवार आवाहन केलं जात आहे. दरम्यान गणेशोत्सवावरही करोना संकट असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच आपत्ती व्यवस्थापनासंबंधी बैठक घेतली. पुढील एक ते दोन दिवसांत गणेशोत्सवासंबंधी नियमावली जाहीर केली जाणार असल्याची माहिती बैठकीत सहभागी झालेले राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

सरकार कोणत्याही सणांविरोधात नव्हे तर करोनाच्या विरोधात – मुख्यमंत्री

“लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर रुग्णसंख्या आणि करोना संकट पुन्हा एकदा वाढू शकतं. अशा पार्श्वभूमीवर काही उचित निर्णय घ्यावे लागतील अशी चर्चा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. आज उद्या तज्ज्ञांशी चर्चा करुन एक दोन दिवसात मुख्यमंत्री नियमावली जाहीर करतील,” असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

जगभरातील गणेशभक्तांसाठी मोठी बातमी! मुंबई पोलीस आणि गणेश मंडळांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

दरम्यान यावेळी विजय वडेट्टीवार यांना नाईट कर्फ्यूबाबत विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, नाईट कर्फ्यूबाबत कोणतीही चर्चा किंवा निर्णय झालेला नाही. तसंच नाईट कर्फ्यू लावण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

जनतेचे आरोग्य महत्वाचे, उत्सव नंतरही साजरे करू – उद्धव ठाकरे

“करोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी  होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत. इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या,” असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत एकदा केले आहे.

“राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच  पक्षांना मी आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही

पुढे ते म्हणाले की, “हे उघडा ते उघडा या मागण्या ठीक आहेत, पण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही.  म्हणूनच माझ्या शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करीत आहे, आपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जिवाचे रक्षण करायला हवे. सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल”.