मराठवाडय़ातील दुष्काळी पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ६३ आमदारांसह मराठवाडय़ात फिरून गेले. त्यानंतर सत्तेत सहभागाबाबतची त्यांची बोलणीही पुढे सरकली आणि मग काँग्रेसला जाग आली. त्यांनीही दुष्काळ परिषद बोलावली. महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी स्वत:च्या हाती सूत्रे घेतली. खास दुष्काळ परिषद बोलावली. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे येतील, असे सांगण्यात आले. अशोकराव चव्हाणांचे नावही पत्रिकेत होते. त्यामुळे कार्यकर्ते जमतील, अशी अपेक्षा होती. मात्र, काँग्रेसची मरगळ एवढी, की दुष्काळ परिषदेत बऱ्याच खुच्र्या रिकाम्या राहिल्या, त्या राहिल्याच. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तर दांडी मारलीच, पण गैरहजेरीची चर्चा झाली ती राजेंद्र दर्डा यांची.
 काँग्रेसचा कार्यक्रम पूर्वी मोठय़ा शामियान्यात व्हायचा. रविवारच्या कार्यक्रमासाठी त्याचा आकार खूपच कमी होता. जुन्या कार्यक्रमांच्या तुलनेत एकचतुर्थाश म्हणता येईल, असा. सकाळी काँग्रेसचे कार्यकर्ते आपापल्या आलिशान गाडय़ांतून उतरले. कार्यक्रमाला कोण येणार, याची आपसात चर्चा सुरू झाली आणि अशोकराव चव्हाण येणार नाहीत, असे बहुतेकांनी सांगितले. पत्रिकेत खासदार रजनीताई पाटील, राजीव सातव यांचीही नावे होती. दर्डाचे नाव मात्र फलकावरही नव्हते. ते का नाही, असे विचारल्यावर एक नेता म्हणाला, पूर्वी त्यांचे नाव टाकले होते. पण ते येतच नाही, असे आता दिसू लागले आहे. तरीही त्यांना दूरध्वनी केला होता. मात्र, आपण बाहेरगावी असल्याचे त्यांनी सांगितले. नेते कधी येणार, हे माहीत नसल्याने दीड-दोन तास कार्यकर्ते रेंगाळले, हळूहळू पांगले. माणिकराव ठाकरेंबरोबर माजी मंत्री नितीन राऊतही आले होते. ते येण्यापूर्वी कार्यकर्त्यांची भाषणे सुरू झाली. तेव्हा अशोकराव चव्हाणांचे कट्टर समर्थक व नांदेड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बी. आर. कदम म्हणाले, काँग्रेसची आजची अवस्था पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वामुळे निर्माण झाली आहे. त्यांनी कधीच शेतकऱ्यांना बळ दिले नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी राबविलेल्या योजना पृथ्वीराज चव्हाणांनी महाराष्ट्रात नीटपणे अंमलबजावणीत आणल्या नाहीत. वारंवार निवेदने दिली. पण ती निवेदने पी.ए.कडे द्या, एवढेच ते सांगायचे. कित्येकदा फोन केला, तर त्यांनी तो उचललाच नाही. त्यामुळे तेच काँग्रेसच्या मरगळीस कारणीभूत आहे, अशी टीका कदम यांनी केली आणि कार्यकर्त्यांनीही खालून टाळय़ा वाजवल्या. जिल्हाध्यक्षांनी केलेले हे वक्तव्य काही जणांना चांगलेच झोंबले. प्रकाश मुगदिया यांनी या टीकेचा समाचार घेतला. आपसात भांडू नका, ही वेळ नाही असे माजी आमदार नारायण पवारही म्हणाले. तत्पूर्वी आमदार अमर राजूरकर यांनी ‘भावनेच्या भरात कदम जरा अधिक बोलले, पण त्यात पोटतिडीक होती. पृथ्वीराज चव्हाण आमचे नेते आहेत,’ असे सांगत ती बाजू खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
 माणिकरावांनी नंतर ‘आपण आता विरोधी पक्षात आहोत. याचे भान ठेवावे,’ असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. एकूणच रिकाम्या खुच्र्याभोवती घेण्यात आलेल्या विभागीय दुष्काळी परिषदेस अनेक आमदार अनुपस्थितच होते. या अनुषंगाने माणिकराव ठाकरे यांना विचारले असता, ‘जिल्हानिहाय बैठका घेत आहोत. येथे जरा मोठी बैठक होती. त्यामुळे उपस्थिती तशी जाणवत आहे.’ दुष्काळी परिषदेच्या निमित्ताने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावरही काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली.