News Flash

भविष्यात काँग्रेसला महाराष्ट्रात ‘अच्छे दिन’ येणार; अमित देशमुखांनी व्यक्त केला विश्वास

महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वात दुबळा पक्ष असल्याच्या चर्चांनावरही अमित देशमुखांनी दिलं उत्तर

भविष्यात काँग्रेस नक्कीच चांगलं काम करेल असा विश्वास अमित देशमुखांनी व्यक्त केलाय. (फाइल फोटो सौजन्य: पीटीआय)

राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस हा सर्वात अशक्त पक्ष आहे का?, या प्रश्नावर अ. भा. काँग्रेस समितीचे सचिव आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी भाष्य केलं आहे. ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘दृष्टी आणि कोन’ या दूरसंवादमालेत बोलताना अमित देशमुख यांनी महाविकास आघाडी हा नैसर्गिक पर्याय नव्हता मात्र विशिष्ट राजकीय परिस्थितीमध्ये तिन्ही पक्षांचे १६२ लोकप्रितिनिधी एकत्र आले आणि सरकार स्थानप केल्याचं सांगितलं. याच दूरसंवादादरम्यान त्यांनी महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या परिस्थितीसंदर्भातही भाष्य केलं.

काँग्रेस नेते वेगवेगळं बोलत असतात. विसंवाद दिसतोय आम्हाला काय किंमत आहे सगळं शिवसेना किंवा राष्ट्रवादी चालवते असं अनेकजण ऑफ रेकॉर्ड बोलतात. हे चुकीचं चाललं आहे असं नाही का वाटतं तुम्हाला, असा प्रश्न अमित यांना लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी विचारला. या प्रश्नावर अमित यांनी सरकार निर्माण कशा परिस्थितीमध्ये झालं यासंदर्भात भाष्य केलं.

नक्की वाचा >> राज्यातील महाविकासआघाडी हा नैसर्गिक पर्याय नव्हता, पण… : अमित देशमुख

“तुम्ही म्हणताय तसं काही प्रमाणात वस्तूस्थितीला धरुन असेल पण हे विसरुन चालणार नाही की हा पर्याय महाराष्ट्रासमोर का आला हे लक्षात घ्यायला पाहिजे. हा पर्याय लोकप्रितिनिधिंनी स्वीकारला. हा काही नैसर्गिक पर्याय नव्हता. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये १६२ लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन त्यांनी हा पर्याय स्वीकारला. मतमतांतरे असू शकतात. तुम्ही म्हणताय तसं काँग्रेस नाही तर सत्तेतील सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ही कुजबूज असावी. नवी घडी बसण्यास सुरुवात होते तेव्हा अनेक सोंगट्यांची जागा बदलते. अनेकांना जागा करुन द्यावी लागेत. त्यामुळे अशा चर्चा होतात. या ज्या गोष्टी, भावना आहेत त्याची पक्ष म्हणून आम्ही नोंद घेतोय. तक्रारी सोडवण्याचा आमचा प्रयत्न असतो,” असं अमित यांनी सांगितलं.

अमित यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला धरुनच गिरीश कुबेर यांनी, अनैसर्गिक गोष्टी स्वीकारुन राजकारण करावं लागतं हे बरोबर आहे, पण तीन पक्षांमध्ये सर्वात अशक्त सोंगटी काँग्रेसची आहे असं सर्वसाधारण मत आहे. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल?, असा प्रश्न विचारला. “असं चित्र जरी उभं राहत असेल तर ते वस्तूस्थितीला धरुन नाही किंवा ते सत्य नाहीय,” असं मत अमित यांनी व्यक्त केलं. महाविकासा आघाडीमध्ये काँग्रेस ही मजबूत आहे. ही एक वेळ आहे की जेव्हा पक्ष कमकुवत वाटतेय. तुम्हाला निश्चित सांगू शकतो की आघाडीच्या राजकारणामध्ये येणाऱ्या काळामध्ये तिन्ही पक्ष पुढे कसे उभारी घेता हे पाहाल तेव्हा काँग्रेस तुम्हाला आश्चर्यकारक वाटचाल करताना दिलेस, असा विश्वास अमित यांनी व्यक्त केलं.

काँग्रेसला अच्छे दिन येणार

काँग्रेसला अच्छे दिन येणार असल्याचं भाकितही अमित देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष, विचार आहे. राष्ट्रीय राजकारणामध्ये परिवर्तनाचे वारे वाहू लागतात तेव्हा निश्चित त्याचा काँग्रेसला अधिक फायदा होईल. राज्यात सुद्धा ते प्रकर्षाने दिसेल. पक्षाचं जे संख्याबळ आहे त्याच वृद्धी होईलच. चढ उतार प्रत्येक पक्षात होतात. काँग्रेसला आव्हानात्मक परिस्थितीतून मार्गक्रमण करावं लागत आहे. आम्ही खचलेलो नाहीत. आम्ही यातून मार्ग काढत आहोत. पक्ष संघटना, कार्यकर्ता मजबूत कसं होईल यासाठी काम करतोय. आता काँग्रेस क्रमांक तीनचा पक्ष वाटत असला, तसं दिसत असलं तरी हे सत्य नाही हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल, असं अमित यांनी सांगितलं.

काँग्रेसचं नेमकं काय चाललंय?

मुलाखतीच्या सुरुवातीलाच, तुमचं आणि तुमच्या पक्षाचं सध्या नेमकं चाललंय काय? असा प्रश्न अमित देखमुख यांना विचारला. त्यावर उत्तर देताना अमित यांनी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीसंदर्भात काही सांगण्याची गरज नाही, मागील अनेक वर्षांपासून आपण पक्षाचं काम पाहत आलेलो आहोत असं म्हणलं. तसेच सध्या आम्ही राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्ष म्हणून आम्ही भूमिका बजावतोय. तर महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडीत सत्तेत आहोत. देशात आम्ही विरोधी पक्षात तर राज्यात सत्ताधारी पक्षात आहोत. सध्या आमची हीच भूमिका आहे असं अमित यांनी स्पष्ट केलं.

काँग्रेसचे नेते कमी पडतात का?

राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपलं आहे ही भावना दाखवण्यात काँग्रेस नेते कमी पडतात का?, या प्रश्नाचंही अमित यांनी उत्तर दिलं. मला क्षणभरासाठीही वाटत नाही की हे सरकार आपलं नाही. आम्ही किमान समान कार्यक्रमाचा स्वीकार करुन सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. निवडणुकानंतर जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्यातून महाविकास आघाडीचा जन्म झाला, असं अमित यांनी सांगितलं. आम्ही सरकारमध्ये आहोत आणि किमान समान कार्यक्रमाअंतर्गत काम करतोय. आव्हान पेलत, समतोल राखत सरकार जनतेच्या सेवेसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतोय असंही अमित म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2021 6:31 pm

Web Title: congress will do great work in future says congress leader amit deshmukh at loksatta drusthi ani kon scsg 91
Next Stories
1 राज्यातील महाविकासआघाडी हा नैसर्गिक पर्याय नव्हता, पण… : अमित देशमुख
2 राज्यात अनलॉकची सुरुवात: जाणून घ्या कोणत्या टप्प्यात काय सुरु आणि काय बंद राहणार!
3 Video : ‘दृष्टी’ आणि ‘कोन’मध्ये दूरसंवादमालेत अमित देशमुख यांच्याशी संवाद
Just Now!
X