News Flash

धुळे, नंदुरबार जिल्हा परिषदांवर काँग्रेसचा झेंडा

धुळे जिल्हा परिषदेत ३० जागांवर विजय मिळवत काँग्रेसने पुन्हा आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळविले तर नंदुरबार जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला धक्का देत काँग्रेसने सत्ता हिसकावून

| December 3, 2013 01:30 am

धुळे जिल्हा परिषदेत ३० जागांवर विजय मिळवत काँग्रेसने पुन्हा आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळविले तर नंदुरबार जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला धक्का देत काँग्रेसने सत्ता हिसकावून घेतली. या ठिकाणी ५५ पैकी २९ जागांवर काँग्रेसने विजय मिळविला तर राष्ट्रवादीच्या पारडय़ात २५ जागा पडल्या. वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधू प्रकाश गावित यांनाही पराभवाचे धनी व्हावे लागले तर केंद्रीय राज्यमंत्री काँग्रेसचे नेते माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित व स्नुषा संगीता गावित हे दोघे विजयी झाले.
धुळे जिल्हा परिषदेत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. एकूण ५६ पैकी ३० जागांवर काँग्रेसने विजय संपादित केला. राष्ट्रवादीला ७, भाजप १३, शिवसेना २ आणि अपक्ष उमेदवाराला एका जागेवर समाधान मानावे लागले. कृषी सभापती प्रा. अरविंद जाधव यांना पराभूत व्हावे लागले. धुळे पंचायत समितीत काँग्रेसने १७ जागा मिळवून ही समिती शिवसेनेच्या ताब्यातून खेचून घेतली. साक्री तालुक्यात जिल्हा परिषदेच्या गटात राष्ट्रवादी चार, भाजप पाच, काँग्रेसला सात जागा मिळाल्या. शिरपूर तालुक्यात काँग्रेसने ११ जागांवर विजय मिळविला. शिंदखेडा तालुक्यात भाजपने चार, शिवसेना व अपक्ष प्रत्येकी एक तर काँग्रेसने तीन गटात विजय प्राप्त केला.
नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. मागील  निवडणुकीत जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले होते. डॉ. विजयकुमार गावित यांच्या राजकारणाला चाप लावण्यासाठी समस्त काँग्रेसजन एकत्र आले . राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेतील सत्ता गमवावी लागली. भाजपच्या पदरात केवळ एक जागा पडली. नंदुरबार पंचायत समितीत काँग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी दहा जागांवर विजय मिळविला. नवापूर पंचायत समितीवर ११ जागाजिंकून काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले. राष्ट्रवादीला सात जागांवर समाधान मानावे लागले. शहादा तालुका पंचायत समितीवरही काँग्रेसने बहुमत मिळविले. तळोदा पंचायत समितीत सात जागांवर विजय मिळवत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळविली. राष्ट्रवादीला धडगाव पंचायत समितीवर वर्चस्व कायम राखणे शक्य झाले.

धुळे जिल्हा परिषद
एकूण जागा ५६
काँग्रेस  ३०
भाजप १३
राष्ट्रवादी काँग्रेस ७
शिवसेना २
अपक्ष १
नंदूरबार जिल्हा परिषद
एकूण जागा ५५
काँग्रेस २९
राष्ट्रवादी काँग्रेस २५
भाजप १

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 1:30 am

Web Title: congress win dhule nandurbar zila parishad election
Next Stories
1 लोकपाल विधेयकासाठी काँग्रेसचे प्रयत्न नाहीत
2 राज्यात केवळ तीनच सूतगिरण्या नफ्यात
3 अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांच्या नजरा अधिवेशनावर
Just Now!
X